Hema Sharma Husband : ‘बिग बॉस १८’ हा रिऍलिटी शो प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. या शोमध्ये विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे झळकत आहेत. ‘व्हायरल भाभी’ हेमा शर्माही यंदाच्या पर्वात स्पर्धक म्हणून पाहायला मिळतेय. तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. युगांडाच्या NRI गौरव सक्सेनाने अलीकडेच त्याच्या ‘गौरव की कहानी’ या यूट्यूब चॅनेलवर पत्नी हेमा शर्माने आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांबद्दल भाष्य केले. हेमा शर्माचे पती गौरव यांचा दावा आहे की, ‘हेमा त्यांना त्यांच्या मुलाला भेटू देत नाहीत’.
गौरवच्या मते, हेमा मुलांना चांगले संस्कार शिकवत नाही. त्याने सांगितले आहे की, हेमाने त्याच्याकडे २.५० कोटी रुपयांचा २ बीएचके फ्लॅट खरेदी करण्याची मागणी केली होती आणि तसे करण्यात अयशस्वी झाल्यामुळे तिने आपल्या मुलाला भेटू दिले नाही. गौरवने सांगितले की, तो आधीच हेमाला दर महिन्याला खूप पैसे देत आहे, ज्यामध्ये त्यांच्या सध्याच्या घराचे भाडे देखील समाविष्ट आहे आणि इतका महागडा फ्लॅट तो घेऊ शकत नाही. त्यांनी परवडणाऱ्या भागात घर घेण्याची ऑफर दिली, पण हेमाने ती ऑफर नाकारली.
गौरवने सांगितले की, तो हेमावर मार्च २०२४ पर्यंत दरमहा ३ ते ४ लाख खर्च करत होता आणि एप्रिल २०२४ पासून तो तिला दर महिन्याला १ लाख देत होता, कारण ते एप्रिल २०२४ च्या मध्यात वेगळे झाले होते. तरीदेखील आजपर्यंत तो हेमाला मासिक भाडे देत आहे. हेमाने गौरववर आपल्या मुलाचे अपहरण केल्याचा आरोपही केला आहे. मात्र, गौरवचा दावा आहे की, हेमाला त्यांच्यबरोबर वेळ घालवता यावा म्हणून त्याने लेकाला स्वेच्छेने तिच्याकडे सुपूर्त केले. गौरवने आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी युगांडातून भारतात आल्यावरचा एक प्रसंगही शेअर केला. यावेळी हेमाने त्यांच्या मुलाला पाहू देण्यास नकार दिला. हेमाला देण्यासाठी त्यांनी भेटवस्तूदेखील एका डिलिव्हरी मॅनकडे दिल्या.
गौरवच्या म्हणण्यानुसार, हेमाने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. सध्या ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोची स्पर्धक असलेल्या हेमाने ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी त्याला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही आणि लेकाला सोडून ती या शोमध्ये गेली. सहानुभूती मिळविण्यासाठी ती शोमध्ये वाईट बोलू शकते असा त्याचा विश्वास आहे. मात्र, या संदर्भात हेमाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.