कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या पर्वाला आतापर्यंत एकूण ५७ दिवस पूर्ण झाले आहेत आणि घरातील प्रत्येक सदस्याविषयी प्रेक्षकांना माहीत झाले आहे. त्याचबरोबर नॉमिनेशन टास्कमुळे कोण कुणाचा मित्र आहे आणि कोण कुणाचा शत्रू आहे हेदेखील प्रेक्षकांना स्पष्ट झाले आहे. या शोमधून आतापर्यंत सना रईस खान, सनी आर्या, जिग्ना व्होरा, नावेद सोल, मनस्वी व सोनाली बन्सल हे सहा स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. तर आता येत्या आठवड्यात घरातील बाकी स्पर्धकांपैकी ४ स्पर्धक नॉमिनेट होणार आहेत.
‘बिग बॉस’च्या ५८व्या आगामी भागात नॉमिनेशन टास्क होणार आहे आणि हे नॉमिनेशन जाहीरपणे होणार नसून घरातील स्पर्धकच एकमेकांना नॉमिनेट करणार आहेत . घरातील प्रत्येक स्पर्धकाला कन्फेशन रूममध्ये बोलावले जाणार आहे आणि कन्फेशन रूममधील स्पर्धक घरातील इतर सदस्यांपैकी २ जणांची नावे घेणार आहे. या टास्कदरम्यान विकी, खानझादी, अभिषेक व नील या ४ सदस्यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे या चार सदस्यांना नॉमिनेशनचा धोका आहे. तर अरुणला गेल्या आठवड्याच्या टास्कमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे नॉमिनेशनमधून वाचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे तो या नॉमिनेशन टास्कमध्ये सुरक्षित राहणार आहे.
विकी घरातील सर्वांना एकत्र ठेवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही एका सदस्याचा होऊ शकला नाही. विकीने ज्यांना ज्यांना मित्र बनवले त्या प्रत्येकाने विकीचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे तो अडचणीत आला आहे आणि तो जर घराबहेर गेला तर अंकिताचाही खेळ सुधारू शकतो असे म्हटले जात आहे. दुसरीकडे खानजादीने अनेकदा तिला या घरातून बाहेर जायचे असल्याचे सांगितले आहे. मात्र मनातून तिची या घरात राहायची इच्छा आहे. फक्त कॅमेऱ्यासमोर दिसणे व खोटे बोलणे हा तिचा आता स्वभाव सर्वांनाच माहीत झाला आहे. अभिषेकही कधीकधी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो, तर कधीकधी तोही विचित्र वागतो. सुरुवातीला तो ईशाभोवती घुटमळत होता, त्यानंतर तो विकीचा चमचा असल्यासारखे वागत होता आणि आता तो खानजादीच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे त्याची स्वत:ची अशी वेगळी ओळख नाही. पण त्याच्यामुळे या शोला टीआरपी मिळत असल्यामुळे तो घराबाहेर जाण्याची शक्यता कमी वाटत आहे.
नीलचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र या शोला इतके दिवस होऊनही आतापर्यंत त्याचा खेळ दिसून नाही आला. घरात टास्कदरम्यान तो कुणावरही जोराने ओरडतो. त्याच्या अशा वागण्याने तो घरात टिकून राहील असं त्याला वाटतं. शोमध्ये पूर्णवेळ तो फक्त पत्नी ऐश्वर्याबरोबरच दिसतो. त्यामुळे घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विकी, खानझादी, अभिषेक व नील यांच्या डोक्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे.त्यामुळे आगामी भागात या घरातून कोण बाहेर जाणार आणि कोण घरात राहणार यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.