‘बिग बॉस १४’ची विजेती बॉस लेडी रुबिना दिलैक अनेकदा चर्चेत असते. सध्या रुबिना दिलैक तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि तिचा पती अभिनव शुक्ला लवकरच जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. त्यांच्या आयुष्यातील या आनंदाच्या आगमनासाठी दोघेही प्रचंड उत्साहित आहेत. रुबिनाने मॅटर्निटी फोटोशूटचे बरेच फोटो सोशल मीडियावरून शेअरही केले. या फोटोंवरून रुबिनाला सोशल मीडियावर सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच अभिनेत्रीने ट्रोलिंगबद्दल उघडपणे भाष्य केलं असल्याचं समोर आलं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर गर्भधारणेदरम्यान सौंदर्य उपचार घेतल्याचे आरोप केले आहेत. (Rubina Dilaik Answers To Trollers)
वेळोवेळी रुबिना दिलैक तिला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना दिसते. नुकतेच रुबीनाने सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबाबत पुन्हा एकदा उघडपणे भाष्य केलं आहे. रुबिनाने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रोशेल रावसह संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रुबिना व रोशेलने गरोदरपणात महिलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल सांगितले.
या व्लॉगमध्ये रुबिना व रोशेल यांनी गरोदरपणात शरीरात कसे बदल होतात यावर चर्चा केली. दरम्यान, रुबिनाने खुलासा केला की, तिच्यावर गरोदरपणात सौंदर्य उपचार घेतल्याचा आरोप आहे. तिच्यावर ओठांची शस्त्रक्रिया व गाल लिफ्ट सर्जरी केल्याचा आरोप असल्याचेही तिने उघड केले.अशा टीकेला कंटाळून रुबिनाला तिच्या सोशल मीडिया पोस्टचे कमेंट सेक्शन बंद करावे लागले.
या आरोपाबाबत रुबिना म्हणाली, ‘मी हे बोलू नये. लोक माझ्या पोस्टवर कमेंट करु लागले आणि म्हणाले की, “तिच्याकडे पाहा, तिने तिच्या ओठांची सर्जरी केली आहे, तिने तिच्या गालांचीदेखील सर्जरी केली आहे. अरे भाऊ, मी काही केले नाही, मला सूज आली आहे. मी हे तुम्हाला कसे समजावू?” असं अभिनेत्री म्हणाली. पुढे अभिनेत्रीने या टीकेमुळे मी कमेंट सेक्शनही बंद केलं असल्याचं सांगितलं
रुबिना व अभिनवचे लग्न शिमलायेथे २०१८ साली झाले. लॉकडाऊन दरम्यान त्यांचे नाते कठीण टप्प्यातून जात होते. यावेळी दोघांमध्ये भांडणही होत होती. यानंतर दोघांनी सलमान खानच्या वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस १४’ मध्ये भाग घेतला आणि स्वतःला एक शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये आल्यानंतर त्यांनी आपले मतभेद दूर केले आणि त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.