‘धर्मवीर’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या आगामी सिनेमाकडे प्रेक्षकांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. नुकताच या चित्रपट सोहळ्याचा भव्य दिव्य असा ट्रेलर लॉन्च सोहळा थाटामाटात संपन्न झाला. अगदी राजकीय नेते, कलाकार मंडळी, दिग्गज मंडळी यांच्या उपस्थितीत बॉलीवूडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासाचा पुढचा टप्पा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धर्मवीर या चित्रपटाचा हा सिक्वेल असून धर्मवीर चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यांत शंका नाही. (Dharmaveer 2 release date)
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला होता. अभिनेता प्रसाद ओक यांनी साकारलेली धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका हे धर्मवीर चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचा टीझर लाँच करुन दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या सगळ्या प्रश्नांना पुर्णविराम दिला. २० जुलैला मुंबईत ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आणि या सोहळ्यास मोठ्या मोठ्या दिग्गजांनी उपस्थिती लावली. चित्रपटाचं लाँच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालं.
अशातच आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत, “राज्यात सुरु असलेली पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. पुढील प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करु”, असं कॅप्शन देत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
‘धर्मवीर २’ या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टुडिओज’ आणि ‘साहील मोशन आर्ट्स’ या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी साकारली आहे.