Ruchita Jamdar Eviction : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात दर आठवड्याला होणाऱ्या एलिमिनेशनकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष असतं. याच दरम्यान आता शोमधून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या आठवड्यातील एलिमिनेशनमध्ये अभिनेत्री रुचिता जामदार हिचा प्रवास संपल्याची चर्चा रंगली आहे. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यात प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद आणि सागर कारंडे, रुचिता जामदार, संस्कृती साळुंके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. त्यामुळे यापैकी कोणाचा प्रवास संपणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
दरम्यान, शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये शोचे होस्ट रितेश देशमुख घरातील सदस्यांना सांगताना दिसतात, “जेव्हा जेव्हा या घरात गेमला हलकं घेतलं जातं, तेव्हा ‘बिग बॉस’ आणि मी मोठं अॅक्शन घेतो.” त्यानंतर ते सांगतात की, या क्षणी घरात मोठं एलिमिनेशन होणार आहे. हे ऐकताच घरातील वातावरण भावुक होतं आणि अनेक सदस्य रडताना दिसतात. समोर आलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात रुचिता जामदार हिला घराबाहेर जावं लागल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सुरुवातीपासूनच रुचिताचा खेळ पाहता ती टॉप-५ पर्यंत नक्की पोहोचेल, असा अंदाज अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून ती घरात अनेकदा खचलेली आणि भावनिक झालेली दिसत होती.
अखेरीस या सगळ्याचा फटका रुचिताला बसल्याचं बोललं जात असून तिचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपल्याचं सांगितलं जात आहे. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, अद्याप Colors Marathi किंवा ‘बिग बॉस मराठी’कडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख नेमकं कोण घराबाहेर जाणार? याची अधिकृत घोषणा करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मात्र सोशल मीडियावर रुचिता जामदारच्या एलिमिनेशनच्या चर्चा जोरात सुरू आहेत.





