Ajit Pawar Plane Crash News : राज्यातून सध्या एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान मोठा विमान अपघात झाल्याची डीजीसीएकडून माहिती समोर आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने, म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी आले होते. मात्र, लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
डीजीसीएने सांगितलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झालं. अपघातग्रस्त ठिकाणचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर आणि जळालेलं विमान दिसत आहे. या विमानातून अजित पवार यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि काही जवळचे सहकारी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप विमानतळ प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा केली जात आहे.




