जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या चित्रपटातून भरत जाधव व गौरव मोरे हे महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांना दिसणार आहेत. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असताना ‘लंडन मिसळ’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे टीझर शेअर केला आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
चित्रपटात अभिनेत्री ऋतुजा बागवे, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आणि भरत जाधव आदि कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची ही गोष्ट आहे. पण जग्गनाथरावांच्या एका नियमामुळे या दोन बहीणींचं आयुष्य बदलून जातं. याची मजेशीर कहाणी म्हणजे ‘लंडन मिसळ’. दरम्यान चित्रपटाच्या या टीझरने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा – …अन् बारशाला राहुल वैद्यने लेकीच्या पायाला केलं किस, गायकावर कौतुकाचा वर्षाव, पाहा सुंदर फोटो
आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना नेहमीच आश्चर्याचा सुखद धक्का देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायले आहे. तसेच ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित असल्याचेदेखील म्हटले जात आहे. ऋतुजा-रसिका यांच्या हटके भूमिकेमुळे आणि भरत जाधव यांच्या विनोदी फोडणीमुळे चित्रपट मनोरंजक असल्याचे दिसत आहे.
‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. तसेच या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट हे आहेत. सानिस खाकुरेल हे सह-निर्माते आहेत आणि वैशाली पाटील या सहयोगी निर्मात्या आहेत. या टीझरमुळे प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.