‘भाभीजी घर पर है’ मालिकेमुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. शुभांगी तिच्या कामामुळे प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिली. कामाबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. तिने २० वर्षांहून अधिक काळ संसार केला. मात्र पती पियुष पुरेसह तिने घटस्फोट घेत आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेतला. आता नवं आयुष्य जगत असताना शुभांगीसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती पियुष पुरेचं निधन झालं आहे. काही काळापासून पियुष आजारी होता. त्याची आजारपणाशी सुरु असलेली झुंज अखेरीस संपली. याच संपूर्ण घटनेबाबत शुभांगीनेही भाष्य केलं आहे. (bhabhiji ghar par hai actress shubhangi atre ex husband passed away)
पूर्वाश्रमीच्या पतीचं निधन अन्…
पियुषला यकृतासंबंधित आजार होता. घटस्फोटाच्या अवघ्या अडीच महिन्यांमध्येच पियुषने जगाचा निरोप घेतला. दोन वर्षांपूर्वीच शुभांगीने पियुष व तिच्या नात्यामध्ये दुरावा आला असल्याचं सांगितलं होतं. ५ फेब्रुवारीला दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पियुष व शुभांगी एकमेकांशी बोलतही नव्हते. पण आता ती दुःखात आहे. तिने पुन्हा ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
काय म्हणाली शुभांगी अत्रे?
शुभांगी व पियुषला १८ वर्षांची मुलगीही आहे. ती सध्या परदेशात तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. शुभांगी म्हणाली, “या कठीण काळामध्ये तुम्ही माझी विचारपूस करता आहात त्याचा मी आदर करते. पण मी तुम्हाला विनंती करते की, याबाबत बोलण्यासाठी मला थोडा वेळ द्या”. शुभांगीने नव्याने कामाला सुरुवात केली आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामधून बाहेर पडण्यासाठी तिला थोडा वेळ लागणार असल्याचं चित्र दिसतंय.
शुभांगी व पियुष यांच्या नात्यामध्ये काही वर्षांपासून दुरावा आला. मात्र लेकीसाठी दोघंही घटस्फोट घेत नव्हते. अखेरीस दोघांनी निर्णय घेत अधिकृतरित्या एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. २०व्या वर्षीच शुभांगीने लग्न केलं होतं. तिने सांगितलं होतं की, “आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. माझं लग्न २०व्या वर्षीच झालं. सगळं काही माझ्यासाठी सोपं नव्हतं. यापुढे मी प्रेमाला दुसरी संधी देईन असं मला वाटत नाही”. शुभांगी आता एकटीने तिचं आयुष्य जगत आहे.