न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल आल्यापासून, मल्याळम, तमिळ व तेलुगू चित्रपट उद्योगातील अनेक कलाकार लैंगिक अत्याचार आणि छळाच्या धक्कादायक प्रकारणांसह पुढे आले आहेत. आता अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका हिंदी चित्रपट निर्मात्याने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदेने याबाबतचा दावा केला. शिल्पाने खुलासा केला की, एकदा ऑडिशनच्या नावाखाली चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले गेले. त्यावेळी ती खूप शांत होती आणि तिने हा सीन करण्यास होकार दिल्याचे सांगितले. तथापि, परिस्थिती वाढत असताना, तिला समजले की तो मर्यादा ओलांडत आहे त्यावेळी पळून जाण्यापूर्वी त्याला दूर ढकलून ती पळून गेली. (Shilpa Shinde On Harrasment)
अभिनेत्री म्हणाली, “हे माझ्या संघर्षमय दिवसात घडले. १९९८-९९ च्या आसपास. मी नावं घेऊ शकत नाही, पण तो मला म्हणाला, तू हे कपडे घाल आणि हा सीन कर. मी ते कपडे घातले नव्हते. सीनमध्ये, त्याने मला सांगितले की तो माझा बॉस आहे आणि मला त्याला आकर्षित करायचे आहे. तेव्हा मी खूप निर्दोष होते, म्हणूनच मी हा सीन केला. त्या माणसाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप घाबरले. मी त्याला ढकलून बाहेर पळत सुटले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार लक्षात आला आणि त्यांनी मला ताबडतोब निघून जाण्यास सांगितले”.
शिल्पाने निर्मात्याचे नाव न सांगण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “तो हिंदी चित्रपटसृष्टीतला होता. मी हा सीन करायला होकार दिला कारण तो देखील एक अभिनेता होता. मी खोटे बोलत नाही, पण मी त्यांची नावे घेऊ शकत नाही. त्यांची मुलं माझ्यापेक्षा थोडी लहान असतील आणि मी त्यांचे नाव सांगितले तर त्यांनाही वाईट वाटेल”. त्याच निर्मात्याबरोबर वर्षांनंतर घडलेल्या एका घटनेचाही शिल्पाने उल्लेख केला. ती म्हणाली, “काही वर्षांनी मी त्याला पुन्हा भेटले आणि तो माझ्याशी प्रेमाने बोलला. त्याने मला ओळखले नाही. आणि त्याने मला एका चित्रपटात भूमिकाही दिली. मी तो चित्रपट करायला नकार दिला”.
‘भाभी जी घर पर हैं’ मधून प्रसिद्धी मिळविलेल्या या अभिनेत्रीने पुढे सांगितले की, इंडस्ट्रीत अनेक लोकांबरोबर असेच अनुभव आले आहेत.अभिनेत्री म्हणाली, “या गोष्टी सगळ्यांबरोबरचं घडतात. काही माझ्यासारखे पळून गेले. त्यांनी देखील अशाच परिस्थितींचा सामना केला आहे. जेव्हा लोक लैंगिक छळाबद्दल बोलतात, तेव्हा माझा ठाम विश्वास आहे की, तुमच्याशी संपर्क साधला गेला असेल, परंतु तुमच्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय देखील आहे”.