Baba Siddiqui : शाहरुख खान आणि सलमान खान हे बॉलीवूडमधील सर्वात मोठी नाव आहेत आणि त्यांच्या सुपरस्टारडमसाठी अनेकदा त्यांची एकमेकांशी तुलना केली जाते. सलमान व शाहरुख यांच्यात आता घट्ट मैत्री पाहायला मिळत असली तरी एक काळ असा होता जेव्हा ते एकमेकांच्या उच्च-प्रोफाइल वादात अडकले होते. बाबा सिद्दीकी या एका माणसामुळे त्यांच्यातील हे वैर संपले. बाबा सिद्दीकी हे राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून त्यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, २००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान व शाहरुख या दोघांचं एकमेकांशी जोरदार भांडण झाले होते. या घटनेनंतर दोघांनीही मोठ्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी भिडण्याचे टाळले. त्यानंतर २०१३ मध्ये, बाबा सिद्दीकी यांच्यामुळे बॉलीवूडच्या या मोठ्या नावांमधील भांडण संपले. २०१३ मध्ये, त्याच्या इफ्तार पार्टीला इंडस्ट्रीतील प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये सलमान आणि शाहरुख खान खूप दिवसांनी एकाच छताखाली दिसले होते. या पार्टीत दोन्ही कलाकारांनी मिठी मारली आणि अर्ध्या दशकापासून सुरु असलेले वैर संपवले.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकींची हत्या, बॉलिवूड कलाकारांनी रुग्णालयात घेतली धाव, सलमान खान, शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर
सलमान खान सध्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १८ व्या पर्वाचं शूटिंग करत आहे. दर वीकेंडला तो स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी जातो. शनिवारी होस्टिंग सुरु असताना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समोर आली. यावेळी भाईजानने त्वरित शूटिंग थांबवलं आणि तो लीलावती रुग्णालयात पोहोचला. बाबा सिद्दीकींवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्यावर त्यांना लगेच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते.
आणखी वाचा – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने रितेश देशमुखला धक्का! न्यायाचे आवाहन करत म्हणाला, “गुन्हेगारांना कठोर…”
बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार (विधानसभा सदस्य) होते. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी तीन वेळा आमदार म्हणून काम पाहिले. २००४ ते २००८ पर्यंत ते अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि एफडीए राज्यमंत्री झाले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.