Seema Chandekar : प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांच्या यादीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचे नाव आवर्जून घेतलं जातं. मालिका, चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका करत सिद्धार्थने त्याच्या कामाची छाप पाडली आहे. कामाबरोबरच सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ-मिताली या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सोशल मीडियावरही सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय का घेतला याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. वर्षभरापूर्वीच सिद्धार्थची आई सीमा यांनी त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात केली. सिद्धार्थच्या आईने दुसरे लग्न केलं. सीमा चांदेकर व त्यांच्या पतीचा फोटो सिद्धार्थने इंस्टाग्रामवरुन शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. आता सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न का केलं याबाबत त्यांनी स्वतः केलेलं वक्तव्य समोर आलं आहे.
सीमा चांदेकर यांनी ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना, “मुलं मोठी झाली, सगळं झालं आहे. मग ५७ व्या तुम्हाला का वाटलं की, दुसरं लग्न करावं”, असा संवाद साधला. यावेळी बोलताना सीमा म्हणाल्या, “हा निर्णय घ्यायलादेखील मला खूप वर्षं लागली आणि असं नाहीये की, मुलं सेटल झाली, त्यांचं सगळं झालं आहे. ती माझ्याबरोबर होतीच. त्यामुळे मला एकटेपणा वाटण्याचं काही कारण नव्हतं. तीन वर्षांपूर्वी माझा अपघात झाला. बाईकने धडक दिली. त्यावेळी माझ्या उजव्या हातात प्लेट होती आणि मी कुठेही जाऊ शकत नव्हते”.
आणखी वाचा – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने रितेश देशमुखला धक्का! न्यायाचे आवाहन करत म्हणाला, “गुन्हेगारांना कठोर…”
पुढे त्या म्हणाल्या, “फोन, व्हिडीओ कॉल चालू होते. वेळ मिळाला की, सिद्धार्थ, सुमेधा सगळे येऊन भेटत होते. या वयात लग्न करण्याची काय आवश्यकता आहे, असं म्हटलं जातं. पण मला वाटतं बाकीच्या कुठल्या गरजांसाठी आपण लग्न करीत नाही. माझ्यासारख्या प्रत्येक बाईने हा विचार करावा असं म्हणणं माझं नाही आहे. प्रत्येकाचा विचार हा वेगळा असेल. कोणाला वाचनात रस असेल, कोणाला फिरण्याची आवड असेल. ती तिचं आयुष्य एकटीने समर्थपणे घालवू शकते अशीही काही उदाहरणे आहेत. मला अभिमान आहे त्यांचा, की मी कुठेतरी त्यांच्यामध्ये एक पाऊल मागे पडले. पण मी कायम माणसात राहिले. त्यांच्या छोट्या छोट्या निर्णयात मी सहभागी असायचे, ते मला येऊन सांगायचे. अपघात झाल्यानंतर मला कुठेतरी एकटेपणा जाणवला”.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकींची हत्या, बॉलिवूड कलाकारांनी रुग्णालयात घेतली धाव, सलमान खान, शिल्पा शेट्टीला अश्रू अनावर
त्या असेही म्हणाल्या की, “मला आता सांगायचं आहे की, माझी बाई आज कामावर आली नाही, मला असा असा त्रास झाला, तर या गोष्टी मी सिद्धार्थला फोनवर नाही ना सांगू शकत. कुठल्याही गोष्टी अरे, आज इतकी मजा आली, आज मैत्रिणी आल्या होत्या. मुलं ऐकतात पण त्यांना वेळ पाहिजे ना. मला ते कुठेतरी हळूहळू जाणवायला लागलं. माझ्या सासरच्या लोकांचा मला कायम पाठिंबा होता. ते कायम माझ्या मागे उभे होते. सीमा आमची कधीच चुकणार नाही, असा त्यांचा विश्वास होता. माहेरची माणसं यावेळी खंबीर उभी होती”.