Baba Siddique Death : अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे पूर्व येथे अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबारानंतर माजी राज्यमंत्र्यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निर्मल नगरमधील कोलगेट मैदानाजवळील बाबा सिद्दीकी यांचा मुलगा व आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकारी म्हणाले, “दोन ते तीन गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे”.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबार झाला तेव्हा त्यांच्या ऑफिसजवळ फटाके फोडण्यात येत होते. गाडीतून तिघेजण बाहेर आले. तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दीकीच्या साथीदाराच्या पायात गोळी लागली तर दुसरी गोळी बाबा सिद्दीकी यांना लागली आणि त्यानंतर ते खाली पडले. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्याच्या आणि मृत्यूच्या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राबरोबर रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचली, जिथे तिला अश्रू आवरता आले नाहीत. तर शिल्पाशिवाय सलमान खानही रात्री उशिरा लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्यांच्या आजूबाजूला कडेकोट सुरक्षा व्यवस्था दिसून आली. असे सांगितले जात आहे की सुरक्षेच्या कारणास्तव त्याला रुग्णालयात न येण्यास सांगितले होते, परंतु त्याने ‘बिग बॉस १८’ चे शूटिंग रद्द केले आणि तात्काळ हॉस्पिटल गाठले. मित्र गमावल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. बाबा सिद्दीकी यांनीच सलमान व शाहरुख खानमधील वैर संपवले. तर बातमी कळताच अभिनेता संजय दत्तही घटनास्थळी पोहोचला.
बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची विशेष चर्चा रंगलेली असायची. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये अनेक बॉलिवूडमधील सिनेतारकांना आमंत्रित केलं जायचं. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समजताच सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे शिल्पा शेट्टीही बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत दिसली. त्यांच्यावर झाडल्याचे समजताच ती स्तब्ध झाली. बाबा सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले.