एकीकडे बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडचे चित्रपट कोटींची कमाई करत असताना एक मराठी चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’. मराठीसह हिंदी प्रेक्षक व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी भरभरून कौतुक करताना दिसत आहे. अगदी सहा महिने उलटून गेल्यांनतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. (Sukanya Mone On Mother Wish)
सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाला जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटींहून अधिक कमाई केली असून चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर व दीपा परब या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने चित्रपट अधिक उंचावला. नुकताच या चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग सोहळा पार पडला.
आणखी वाचा – काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार अन्…
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा स्पेशल स्क्रिनिंग सोहळा मुंबई येथ दणक्यात पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान कलाकार मंडळींसह उपस्थितांनी ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. या स्पेशल स्क्रिनिंग सोहळ्याला अभिनेत्री सुकन्या मोने यांनी त्यांच्या आईसह हजेरी लावली होती. या सोहळ्याला प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम पाहून त्या भावुकही झाल्या. दरम्यान चित्रपटाबाबत दोन शब्द सांगताना त्यांनी त्यांच्या आईच्या इच्छेबाबत खुलासा केला.
सुकन्या मोने म्हणाल्या, “आज मला खूप आनंद झाला आहे. मला मिळणारं हे यश, प्रेम तसेच सर्वत्र चित्रपटाचं होणारं कौतुक, सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद हे सर्व आज माझी नव्वद वर्षांची आई स्वतःच्या डोळ्यांनी पाहतेय. तिची इच्छा आहे मला ऑस्कर मिळावा. पण हे मिळालेलं प्रेम ऑस्करच आहे असं मी तिला सांगू इच्छिते. आणि हे मिळालेलं ऑस्कर बघायला ती आज इथे उपस्थित आहे याचा मला जास्त आनंद होत आहे. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. असेच आमच्यावर, तसेच येणाऱ्या प्रत्येक चित्रपटावर भरभरून प्रेम करत रहा. चित्रपटांना थिएटर्स मिळूदे आणि अगदी सहा सहा महिने चित्रपट चालू दे” असं म्हणत त्यांनी सगळ्यांचे आभार मानले.