प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग जबरदस्त आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही विश्वांमध्ये वावरलेले आणि अजूनही आपलं टायमिंग साधत उत्तम विनोद करणारे अशोक सराफ हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच अवघ्या कलासृष्टीसह चाहते मंडळींनी आनंद व्यक्त केला. (Ashok Saraf thanked audience and central govt)
मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. या वर्षी जानेवारी महिना संपताना अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी अनेक ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानले असून मी याबद्दल कायम ऋणी असल्याचेही त्यांनी म्हटलं.कलर्स मराठी वाहिनीकडून अशोक सराफ यांच्या पद्मश्री पुरस्कारानंतरच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांनी असं म्हटलं आहे की, “नमस्कार! मी अशोक सराफ. मला पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मी केंद्र सरकारचा मनापासून आभारी आहे. गेली अनेक वर्षे प्रेक्षकांनी माझा अभिनय, माझे चित्रपट यांना जी दाद दिली आहे. जे प्रेम दिलं आणि जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी प्रेक्षकांचादेखील मनापासून आभारी आहे. हा पुरस्कार माझा नसून प्रेक्षकांचाच आहे, ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं. त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. प्रेक्षकांचे हे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. मनापासून धन्यवाद!”
आणखी वाचा – 07 February Horoscope : नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस संमिश्र, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
उत्तम टायमिंग, मर्म विनोदातून लोकांना हसवणं आणि वेळेला डोळ्यांतून पाणी काढण्याचीही कला अशोक सराफ यांच्या अभिनयात आहे. आजवर अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमधील अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यामुळे अशोक सराफ यांचं नाव घेतल्याशिवाय मराठी सिनेसृष्टी अपूर्ण आहे यात शंकाच नाही.