आपल्या माणसांनी कौतुक करणं ही कायमच प्रत्येकासाठी खास असतं. कितीही पुरस्कार मिळाले तरी आपल्या माणसांची कौतुकाची थाप ही प्रत्येकासाठीच मोठी गोष्ट आहे. आपल्या माणसांकडून झालेलं कौतुक ही भारावणारी गोष्ट आहे. असंच भारावलेपण अनुभवलं होतं एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने. हा अभिनेता म्हणजे ‘टाइमपास’ फेम दगडू, अर्थात प्रथमेश परब. ‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोर दगडू-प्राजूच्या या लव्हस्टोरीने सर्वांना वेड लावलं होतं. दगडू-प्राजूची हटके लव्हस्टोरी आजही अनेक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ‘टाइमपास’ चित्रपटाने दगडू अर्थात प्रथमेश परबच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. (Prathamesh Parab appreciated in his hometown)
या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि खूप कौतुकही झालं. या चित्रपटानंतर अभिनेत्याचे गावीही जंगी कौतुक करण्यात आले होते. याबद्दलची त्याने एक खास आठवण सांगितलं आहे. रेडएफएम मराठीशी साधलेल्या संवादात त्याने ही गावची खास आठवण सांगितली आहे. याबद्दल प्रथमेश असं म्हणाला की, “गावी घर आहे. माझ्या मोठ्या काकाच्या घरी गणपती बसतो, एक भारी आठवण आहे माझी गावची ती म्हणजे ‘टाइमपास’नंतर मी गावी गेलो होतो. तिथे एक महत्त्वाचं घर असतं, जिथे सगळी जण जमून भजन वगैरे म्हणतात आणि तिकडे खाऊ वगैरे असतो. तिथे गावात आलेल्यांचा सत्कार असतो”.
आणखी वाचा – “लोक मला लेस्बियन म्हणायचे आणि…”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “खूप दबाव…”
यापुढे त्याने असं सांगितलं की, “‘टाइमपास’नंतर मी एक वर्षाने तिथे गेलो तेव्हा माझा सत्कार झाला होता. ते माझ्या फार लक्षात आहे आणि मला त्याचं कौतुक वाटलं. आपल्या गावी सत्कार होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याआधी खूप पुरस्कार मिळाले. पण गावी कौतुक होणे ही खूपच मोठी गोष्ट. तसंच मी आधी गावी जायचो तेव्हा मला पक्याचो झील म्हणायचे. म्हणजे मालवणी भाषेत प्रकाशचा मुलगा. पण आता गावी मला प्रथमेशचा बापुस म्हणून ओळखतात. तर हा एकूण प्रवास खूप छान वाटतो”.
आणखी वाचा – “देशात मांसाहारावरच बंदी आणा”, शत्रुघ्न सिन्हांचं मोठं विधान, म्हणाले, “फक्त गोमांसच नाही तर…”
दरम्यान, ‘टाइमपास’ चित्रपटातील त्यांच्या लव्हस्टोरीसह गाणी, संवाद सगळंच काही प्रेक्षकांना भावलं होतं. या चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण होऊनही आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटातील प्रत्येक संवाद आणि गाणी चाहत्यांच्या लक्षात आहेत. या चित्रपटामुळे प्रथमेश सर्वत्र दगडू म्हणून ओळखू जाऊ लागला आणि आजही त्याची तीच ओळख आहे. या चित्रपटाने त्याचं आयुष्य संपूर्ण बदललं.