‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. अप्पी आणि अर्जुन यांच्या सात वर्षांपूर्वी दुरावलेल्या संसाराचे चित्र पुन्हा एकत्र येत असल्याचं दिसत आहे. मात्र वडिलांच्या इच्छे खातर अर्जुनने दुसरा साखरपुडा केलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अप्पी फारच खचलेली दिसत आहे. अप्पी व अर्जुन यांनी घटस्फोट घेतला असून अर्जुनने त्याची सहकर्मचारी आर्यासह साखरपुडा केला आहे. त्यामुळे अप्पी आणि अर्जुन दोघेही कायमचे वेगळे होणार असे दिसत असतानाच अमोलची यात मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. (Appi Amchi Collector Serial Update)
अमोलला अर्जुनच त्याचा बाबा असल्याचे सत्य समजलं आहे. शिवाय बाबांच्या घरच्यांची आणि त्याच्या माँची भांडणं झाली असल्याचेही अमोल समोर आलेलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही घरांना एकत्र आणण्यासाठी अमोल स्वतः कष्ट घेताना दिसत आहे. तर यासाठी अमोलने त्याच्या दोन छोट्या छोट्या मित्रांना मदतीला घेतलं असून नवीन नवीन प्लॅन करायला त्यांनी सुरू केले आहे. अमोल व अप्पीचा एकत्र आणण्याचा प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळालं की, अप्पी व अर्जुनला एका खोलीत अमोल बंद करण्यात यशस्वी होतो आणि तो तिथून निघून जातो. त्या खोलीत साधं नेटवर्कही नसत त्यामुळे अप्पी व अर्जुन बाहेर कोणाशीही संपर्क साधू शकत नाहीत.
त्यावेळेला ते बराच वेळ एकत्र असतात तेव्हा त्यांच्यात थोडफार बोलणं होतं, मात्र अर्जुन अप्पीला सांगतो की, आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत त्यामुळे आपण या विषयावर नाही बोललेलंच बरं असं असलं तरी दोघांच्याही मनात एकमेकांसाठी खूप जागा असते आणि दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असतं. त्यानंतर अर्जुनच्या प्रयत्नांनंतर अखेर ते दोघे बाहेर पडतात आणि आपापल्या घरी जातात. तर इकडे आर्या ही अर्जुनला खूप फोन करते मात्र अर्जुनचा काही फोन लागत नाही. त्यावर अर्जुन तिची माफी मागतो आणि सांगतो की, मी आणि अपर्णा खरंच अडकलो होतो त्याच्यामुळे मला तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता आला नाही.
मात्र आर्याचा गैरसमज होतो आणि ती सुद्धा त्याच्यावर रागावून निघून जाते. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अमोल अप्पी व अर्जुनला एकत्र आणण्यासाठी कोणते प्रयत्न करणार?, आर्या व अर्जुनचं लग्न होऊ नये यासाठी ही तो प्रयत्न करणार का?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरेल.