Appi Aamchi Collector New Promo : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या काळजीपूर्वक वातावरण पाहायला मिळत आहे. या मालिकेतील चिमुकल्या सिंबाची म्हणजेच अमोलची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. मात्र मालिकेत सिंबावर ओढावलेलं आजारपणाचं संकटाने साऱ्यांनाच काळजी वाटू लागली आहे. अमोल त्याच्या आजारपणाला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्याचे ठरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचारासाठी त्याची किमोथेरपी केली सुरु आहे आणि यासाठी अप्पी व अर्जुन तयारी करुन घेताना दिसत आहे. अशातच आता ‘झी मराठी’ वाहिनीने ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.
या प्रोमोच्या सुरुवातीला असं पाहायला मिळतंय की, अमोलचे केस गळत असल्याचे घरातील सर्वांच्या लक्षात येते. यावर अर्जुन म्हणतो, “केमोथेरपीचा डोस दिल्यामुळे अमोलचे केस गळणार”. त्यावर अप्पी म्हणते, “आम्ही अमोलचे केस कमी करण्याचा निर्णय घेतलाय”. अमोल मोठ्याने म्हणतो, “नाही कापायचे केस माझे, नाही कापायचे”. याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळतंय की, अर्जुन अमोलला म्हणतो, “तुला काय वाटतं, तुझा बाबा तुला एकट्याला केस कापून देईल?”.
अमोलचे वडील, मामा, काका, दोन्ही आजोबा असे सगळे केस कापायला बसतात आणि म्हणतात, “कापा आमचे केस”. ते पाहून अमोल, “तुम्ही का कटिंग करताय?”, असे म्हणत सगळ्यांना उठवतो आणि “आता मी या आजाराला हरवणार. मला केस नसले तरीही क्युटी दिसलं पाहिजे क्युटी”, असं म्हणत सगळ्यांची मन जिंकतो. हे बोलताना तो भावूक झालेला पाहून अर्जुन-अप्पीदेखील भावूक होताना दिसत आहेत. “अमोलच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं कुटुंब देणार त्याची साथ!”, असं कॅप्शन देत झी मराठी वाहिनीच्या पेजवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – “खूप सारं प्रेम आणि…”, अमृता खानविलकरच्या वाढदिवसाला नवऱ्याची रोमँटिक पोस्ट, म्हणाला, “प्रगती करत राहा…”
“अमोल लवकर बरा हो बाळा, तुझ्यामुळे मालिका एक नंबर वाटते”, “हा सीन बघितल्यावर खूप इमोशनल वाटलं. खूप छान मालिका आहे”, “सिंबा, तू बरा होशील. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत”, “खूप छान कल्पना केली आहे. खरंच लहान मुलांवर अशी वेळ आल्यावर मुलं किती घाबरतात. पण, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून अमोलवर जी प्रक्रिया दाखवत आहात ती खरंच खूप छान आहे. अमोल तू, असाच स्ट्रॉंग मुलगा राहा”, अशा कमेंट करत नेटकरीही भावुक झाले आहेत.