Vaibhav Mangle Struggle : नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्याच्या यादीत वैभव मांगले हे नाव आवर्जून घेतलं जात. याशिवाय गायन व सूत्रसंचालन यांसारख्या मनोरंजनाच्या क्षेत्रातही वैभव मांगले यांनी आपल्या कला कौशल्याची छाप पाडली. अभिनय क्षेत्रात कुणीही वारसा नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वैभव मांगले छोट्याश्या गावातून मुंबईत आशेचा किरण घेऊन आले. यशस्वी अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. अत्यंत खडतर परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी अडचणींचा सामना पार करत अभिनेता बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अभिनेता बनण्याआधी वैभव मांगले यांना एका वेगळ्याच क्षेत्रात करियर करायचं होत, याबाबत नुकतंच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
पत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनेते वैभव मांगले यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात नोकरीसाठी त्यांना गावोगावी कसे फिरत राहावे लागले, याबद्दल सांगितलं आहे. याबाबत बोलताना त्यांना प्राध्यापक व्हायचे होते, याबाबतचाही खुलासा केला. वैभव मांगले यांनी सांगितलं की, “मला शालेय जीवनापासूनच कला क्षेत्रात रस होता”.
“मला दहावीनंतर एम. ए. करायचं होतं. मला मराठीचा प्राध्यापक व्हायचं होतं. पण मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे मला सायन्सला जावं लागलं. त्यामुळे मी शेवटच्या वर्षात नापास झालो होतो. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर मी बीएड आणि डीएड केलं आहे. मला जर शिक्षकाची नोकरी लागली असती, तर मी मुंबईत येण्याचा कधी विचारही केला नसता. मी मुंबईत आलो तेव्हा २७ वर्षांचा होतो”.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, “२१ व्या वर्षी मी पदवी घेतली. त्यानंतर चार वर्ष मी काहीच केलं नाही. रत्नागिरीत असताना मी एका कोकण कॅप्सूल नावाच्या कंपनीत सात-आठ महिने काम केलं. त्यानंतर सिमेंटचे पाईप बनवण्याच्या कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करायचो. तिथे काही महिने काम केलं, त्यानंतर मग माझ्याकडे काहीच काम नव्हतं”.
“मग वडिलांच्या सांगण्यावरुन मी डीएड केलं. पण, नेमकं तेव्हाच तंत्राटी म्हणून शिक्षक घेऊ लागले. तेव्हा माझ्या बरोबरीची मुलं कुठे ना कुठेतरी कामाला लागले होते. पण, मी नुसताच घरी बसून असायचो. मी उन्हातून नोकरी देता का नोकरी म्हणत फिरत राहायचो,” असं म्हणत वैभव मांगलेंनी कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं.