नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशला मराठी कलाविश्वातील स्टाइल आयकॉन म्हणून ओळखलं जातं. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘दुनियादारी’, ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करत अंकुशने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील भूमिकेचे अनेक कौतुक झाले. यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. अशातच त्याला या भूमिकेसाठी आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. (Ankush Chaudhari Emotional)
अंकुशला नुकताच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील शाहीर साबळेंच्या भूमिकेसाठी ‘आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स २०२४’ हा पुरस्कार मिळाला असून या पुरस्कार सोहळ्याच्या खास क्षणांचा व्हिडीओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना अंकुशला आनंद झाला. मात्र यावेळी तो अतुल परचुरे यांच्या आठवणीत भावुकही झाला. हा पुरस्कार स्वीकरताना अंकुश असं म्हणाला की, “आज सगळ्यात जास्त मला आठवण येत आहे ती म्हणजे अतुल परचुरेची. त्याला मी खूप मिस करत आहे. आज तो आपल्यात नाही. मला कोणताही पुरस्कार मिळाला तरी मला त्याचा फोन येतो. अतुल हा पुरस्कार तुझ्यासाठी…”
अतुल परचुरे यांचं १५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या एक्झिटमुळे सिनेविश्व आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. त्यांच्या अत्यंदर्शनालाही संपूर्ण कलासृष्टी हजर होती. यावेळी अनेक कलाकारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. अतुल यांच्या जाण्यानं मनोरंजन सृष्टीत पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर फक्त सिनेविश्वातीलच नाही तर, अनेक राजकीय मंडळींनीदेखील दुःख व्यक्त केलं. अशातच अंकुशनेही पुरस्कार सोहळ्यात अतुल यांच्या निधनावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, अंकुशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे. ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट १७ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अशातच याचा दूसरा भाग येणार आहे. याचा मुहूर्त पार पडला असून चित्रपटाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. यात मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अशोक सराफ यांच्यासह अभिनेता संकेत पाठक आणि रिंकु राजगुरुही आहेत.