सोशल मीडियावर कलाकारांच्या नावाने अनेक फॅन पेजेस कार्यरत असतात. यापैकी काही फॅन पेजेस हे कलाकारांच्या प्रसिद्धीचे काम करत असतात. त्यांना आणखी लोकप्रिय करत असतात. मात्र असे अनेक सोशल मीडिया पेजेस आहेत, जे या कलाकारांच्या नावाचा आणि त्यांच्या प्रसिद्धीचा व लोकप्रियतेचा गैरवापरही करतात. असंच काहीसं होत आहे, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरबद्दल. सोशल मीडियावर सध्या अंकिता वालावलकरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे आणि याचाच फायदा एका सोशल मीडिया पेजने घेतला आहे. ‘किर्ती आर्ट अँड क्राफ्ट’ नावाच्या एका इन्स्टाग्रामवर पेजने अंकिताच्या नावाचा वापर केला असून अंकितानेही तिच्या नावाच्या गैरवापराबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. Ankita Walawalkar angry on social media page)
अंकिता प्रभू वालावालकर सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. येत्या काही दिवसांत ती लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची पत्रिका शेअर केली होती. त्यामुळे आता सर्वजण तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अंकिताच्या लग्नाच्या याच चर्चांचा वापर करत ‘किर्ती आर्ट अँड क्राफ्ट’ नावाच्या एका इन्स्टाग्रामवर पेजवर मुंडावळ्यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइझ्ड युनिक आणि नाजूक अशा मुंडावळ्या,’ असं या व्हिडीओवर लिहिण्यात आलं असून त्यांनी अंकिता वालावलकरला टॅग करा असंही लिहिलं आहे. त्यानंतर अनेकांनी अंकिताला कमेंट्समध्ये टॅग केलं.

अशातच आता या पोस्टवर अंकिताने कमेंट करत तिने या मुंडावळ्या घेतल्या नसल्याचे स्पष्ट केलं आहे. याबद्दल अंकिताने असं म्हटलं आहे की, “मी फक्त एवढंच सांगेन की, छान व्यवसाय करा, पण खोटं बोलून करु नका. मला खोटं बोलून, माझं नाव वापरुन व्यवसाय केलेला आवडणार नाही. मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाहीत. जे आमच्या लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत, त्यांना क्रेडिट मिळू द्या”.
दरम्यान, नुकतंच अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या लग्नपत्रिकेच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानांवर तिचे व कुणालचे नाव लिहिले असल्याचे पाहायला मिळाले. कुलदेवत व आजोळच्या देवाला तिने लग्नाची ही पहिली पत्रिका अर्पण केली होती. अंकिताचा नवरा कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. त्याने अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत देण्याचे काम केलं आहे