यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन चांगलाच गाजला. या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर्सनी सहभाग घेतला होता. यात धनंजय पोवार, छोटा पुढारी, सूरज चव्हाण यांसह ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकरनेही सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’मध्ये असताना अंकिताने तिला ‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’ असल्याचं म्हटलं होतं. तिचा भांडी घासण्याच्या ट्रॉमा असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे अंकिता वालावलकरला प्रचंड ट्रोलही केलं गेलं होतं. सोशल मीडियावर तिच्यावर मिम्स बनल्या होत्या. यावरुन तिला आजही अनेक ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. मात्र या ट्रोलर्सचा अंकिताही चांगलाच समाचार घेते. (Ankita Walawalkar on troller)
अंकिता सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लवकरच ‘कोकण हार्टेड गर्ल’ लग्नबंधनात अडकणार आहे आणि सध्या तिच्या या लग्नाची लगबग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी तिने लग्नपत्रिकेची झलक शेअर केली होती. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये केळीच्या पानांवर तिचे व कुणालचे नाव लिहिले असल्याचे पाहायला मिळाले होते. कुलदेवत व आजोळच्या देवाला तिने ही लग्नाची पहिली पत्रिका अर्पण केली होती. अशातच तिने कुणालबरोबरचे काही खास फोटो शेअर केल्याचेही पाहायला मिळत आहे.

“देवाने मला जवळजवळ हार मानताना पाहिले, म्हणून त्याने मला सर्वात परिपूर्ण माणूस पाठवला. हा माणूस मला वाचवत आहे आणि या माणसासह मी आता नव्या वर्षात पदार्पण करत आहे. २०२५ मी तुझी वाट पाहत आहे” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र एकाने या फोटोखाली कमेंट करत तिला ‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’वरुन पुन्हा एकदा डिवचलं आहे. एका नेटकऱ्याने अंकिताच्या या पोस्टवर “तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे भावा” अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं शिक्षण किती?, प्रश्न विचारताच म्हणाली, “मीडियाशी संबंधित…”
पण नेटकऱ्याच्या या कमेंटवर अंकितानेदेखील त्याला हटके उत्तर दिलं आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “हो मग तुम्ही येत आहात का? येताना वही-पुस्तक घेऊन या, शब्दांच्या खूप चुका होत आहेत. मी शिकवेन”. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिताने याबद्दल पोस्ट शेअर करत “सोशल मिडियावरच्या २ मिनिटांच्या क्लिपवरून आपण एखाद्या व्यक्तीचं अख्ख आयुष्य क्षणात जज करतो. पण कधी कधी आपल्याला क्षुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशेल विसरतो”. असं म्हटलं होतं.