Ankita Walavalkar And Dhananjay Powar Bhaubeej Special Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात अंकिता वालावलकर व धनंजय पोवार या रील स्टारची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस ‘च्या घरातही अंकिता व धनंजय यांचा स्पेशल बॉण्ड असलेला पाहायला मिळाला. दोघांमधील भावा-बहिणीचं नातं खुलत गेलं. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतरही अंकिताने थेट कोल्हापुरात जात धनंजय पोवारची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. इतकंच नाही तर या भेटीदरम्यान त्यांनी भाऊबीजही साजरी केली. भाऊबीजचे अनेक व्हिडीओ, फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर देखील केले आहेत.
भाऊबीजनिमित्त अंकिताने डीपीला दिलेल्या खास भेटीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. याचा सुंदर असा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये यावेळी कोकणातील मालवणच्या समुद्रकिनारी भरलेल्या बाजारात जाऊन अंकिताने ताजी मच्छी घेतलेली पाहायला मिळाली. त्यानंतर तिथूनच तिने एका आइस बॉक्समध्ये सर्व मच्छी भरुन घेतली आणि त्या बॉक्ससह तिने कोकणातून थेट कोल्हापूर गाठलं. सुरवातीला अंकिता डीपीच्या कोल्हापुरातील फर्निचरच्या शोरुममध्ये पोहोचली.
आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यांमध्येच मोडला होता संसार, नक्की काय झालेलं?
अंकिता या व्हिडीओमध्ये म्हणतेय की,”डीपी दादा बायकोला फक्त कोकणात फिरायला घेऊन येतात आणि नेहमी मला कारण सांगतात की, अगं मला मासे आवडतात. म्हणून मी त्यांच्यासाठी आगळंवेगळं गिफ्ट घेऊन, भाऊबीजेला त्यांना भेटायला आलेय”. या व्हिडीओमध्ये अंकिताने डीपीचे औक्षण केल्याचे दिसत आहे. त्याची बायकोही या व्हिडीओमध्ये डीपीच्या शेजारी बसलेली दिसत आहे. दोघांचेही आशीर्वाद घेतल्यानंतर अंकिताने आणलेलं खास गिफ्ट डीपीला देऊ केलं. भरपूर मासे पाहून डीपी व त्याची बायको खूप खुश झाली. अंकिता जवळपास डीपीला तंबीच देते की, “आता वहिनींना घेऊन काश्मीरला जा, कोकणात यायचं नाही”.
हा व्हिडीओ शेअर करत तिने असे कॅप्शन दिले आहे की, “वेळ सांगून येत नाही. सतत बायकोला फक्त कोकण फिरवणाऱ्या माझ्या भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने एकच विनंती की, वहिनीला काश्मीर फिरायला घेऊन जा”. अंकिता-डीपीचा हा भाऊबीज स्पेशल व्हिडीओ साऱ्यांना आवडला असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे हे नाते नेटकऱ्यांना खूप आवडत असल्याचंही अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.