सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत ही लग्नाची लगबग सुरु असतानाच अंबानी कुटुंबातील लग्नसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सलग तीन दिवस हा प्री-वेडिंग कार्यक्रम रंगणार असल्याचं समोर आलं आहे. (Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Ceremony)
गुजरातमधील जामनगर येथे १ मार्च ते ३ मार्च दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी खास उपस्थिती लावली आहे. अनंत अंबानीचे बालपण जामनगरमधील आहे. तसेच त्यांच्या आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्मदेखील जामनगर या ठिकाणी झाला असल्याने अंबानी कुटुंबीयांनी प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरची निवड केली आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार, तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी व परदेशी दिग्गजांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून जामनगराला पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली असल्याचं समोर आलं आहे. अनंत-राधिकाला लग्नासाठी शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे मंडळी जमलेली पाहायला मिळत आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे जामनगरला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी फोटोंसाठी एकत्र पोज दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत ठाकरे कुटुंबीय भाव खाऊन गेले असल्याचं चित्र दिसतंय.
याशिवाय बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान व कुटुंबीय, सलमान खान, अर्जुन कपूर, रणबीर कपूर त्याची पत्नी आलिया भट्ट व लेक राहासह जामनगरला पोहोचले आहेत. शिवाय नुकतेच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी देणारे रणवीर सिंह व दीपिका पदुकोणही या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.