मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आजवर विविध मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मधील राणूअक्का असो किंवा ‘आई कुठे काय करते’ मधील अनघा, अश्विनीने तिच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्याचबरोबर, ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही ती झळकली होती. केवळ अभिनय क्षेत्रच नाही, तर तिच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ती सामाजिक कार्यातही नेहमीच पुढे येते. तसेच सोशल मीडियाद्वारे विविध मुद्द्यांवर ती सतत आपलं परखड मत मांडत असते. तिच्या याच कार्यामुळे चाहत्यांमध्ये तिची एक वेगळी ओळख बनली आहे. (Ashwini Mahangade speaks actress trolled on Bikini)
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे अनेक कलाकार मंडळी विविध मुद्यांवर त्यांचे मत तर मांडतात. शिवाय ते फोटोज व व्हिडीओज शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींचे बिकिनी फोटो व्हायरल होत आहे. मात्र, या फोटोजमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. काहींनी तर कमेंटद्वारे अभिनेत्रींना संस्कृतीचे धडे देताना दिसले. त्यावरही अभिनेत्री जशास तसे उत्तर देतात. ज्यामध्ये प्रिय बापट, मिताली मयेकर अश्या अभिनेत्रीची नावं घेता येतील. नेमक्या याच मुद्द्यावर आता अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने आपलं मत व्यक्त केलं आहे.
हे देखील वाचा – “यापुढे जर का तुमची घाणेरडी कमेंट आली तर…”, अमृता खानविलकरने ट्रोलर्सला दिली थेट धमकी; म्हणाली, “शिव्या वगैरे…”
अश्विनीने नुकतंच ‘अजब गजब’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. ज्यामध्ये तिने बिकिनीमुळे ट्रोल होणाऱ्या मराठी अभिनेत्रींबद्दल आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “अभिनेत्रींना बिकिनी घातल्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती जपत नाही, असं वाटतं का?” असा प्रश्न अश्विनीला केला होता. त्यावर ती म्हणाली, “तसं नाही. पण एक तर लोकांनी आता ट्रोल केलं ते, ट्रोलर्सचं त्यांचं दुकानच वेगळं आहे. पण त्यातला आपण जर एखाद टक्के विचार केला तर काय होतं की, आपल्या प्रेक्षकांचं कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. याचा अर्थ आहे की, प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकिनीमध्ये नाही बघायचं. कारण ते कलाकारांवर वेगळ्या प्रकारचं प्रेम करतात, ते त्यांना आपल्या घरातले मानतात. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना कदाचित असं वाटतं की नका घालू बिकिनी, तुम्ही परफॉर्मन्स चांगला द्या.”
हे देखील वाचा – शुभांगी गोखले दर दोन वर्षांनी करतात त्यांच्या साड्यांचा सेल, स्वतःच खुलासा करत म्हणाल्या, “साड्यांना…”
अश्विनीचं हे मत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या मतावर अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. अश्विनी महांगडे सध्या एका ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचबरोबर ती ‘झी टॉकीज’च्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.