मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अमृता खानविलकरचंही नाव टॉपला आहे. अमृताने उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कामामध्ये सतत व्यग्र असणारी ही अभिनेत्री तिच्या कुटुंबियांनाही तितकाच वेळ देताना दिसते. शिवाय तिच्या खासगी आयुष्याबाबतही ती आतापर्यंत उघडपणे बोलताना दिसली आहे. पती हिमांशू मल्होत्राविषयीही अमृता काही मुलाखतींमध्ये भरभरुन बोलते. एका मुलाखतीत तर तिने सासूबाईंबाबतचा एक किस्सा सांगितला होता. सासूबाईंनी अमृताकडे सोन्याच्या बांगड्या मागितल्या होत्या. पण अमृताने थेट त्यांना नाही देणार असं म्हटलं. पण हा किस्सा नेमका काय होता हे आपण पाहणार आहोत. (amruta khanvilkar talk about her mother in law)
“लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला सोन्याच्या बांगड्या देणार नाही असं तू सासूबाईंना म्हटलं होतं. हा नेमका काय किस्सा आहे?” असं अमृताला एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, “जरा आता माझं आणि सासूचं बरं चाललं आहे तर यावर न बोलणंच बरं”. पण अमृताने पुढे संपूर्ण किस्साच सांगितला. लग्न कसं झालं? तिच्या लग्नासाठी काय अपेक्षा होत्या? याबाबतही भाष्य केलं. शिवाय लग्न असंच किंवा तसंच झालं पाहिजे अशाही तिच्या काही अपेक्षा नसल्याचं अमृताचं म्हणणं होतं. सासूबाईंकडून पुन्हा बांगड्या मागण्याचं काय कारण होतं हे तिने सांगितलं.
आणखी वाचा – मुंबई सोडून जाणार आमिर खान, अभिनेत्याचा मोठा निर्णय, पण यामागचं नेमकं कारण काय?
अमृता म्हणाली, “माझ्या लग्नाबाबत काही अपेक्षा नव्हत्या. दिल्लीमध्येच लग्न झालं पाहिजे अशी हिमांशूची अपेक्षा होती. मला अगदी साध्या पद्धतीने लग्न हवं होतं. कमीत कमी खर्च करुन बाकीचे पैसे आपण आपल्यासाठी वापरुया असं माझं म्हणणं होतं. पण पंजाबी म्हटल्यावर अवाढव्य खर्च, राजेशाही थाट आला. मी त्याला म्हटलं की, मला फक्त आठ लाख रुपयांची रिंग पाहिजे आहे. तर ती मला फक्त घेऊन दे. लग्न साधं पाहिजे होतं पण चांगलं मंगळसूत्र व अंगठीची माझी अपेक्षा होती. मात्र ती अंगठी त्याने काही दिली नाही”.
“मला माझ्या सासूबाईंनी सोन्याच्या बांगड्या दिलेल्या. एक-दोनवेळा त्यांनी त्या बांगड्या माझ्याकडे मागितल्या. माझ्याकडे दे मी बांगड्या सांभाळते असं त्या मला म्हणत होत्या. पण मी त्यांना सांगितलं की, काहीही झालं तरी त्या सोन्याच्या बांगड्या मी तुम्हाला देणार नाही. मी असं काहीतरी वागेन असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण लग्न झालं की, तुम्ही खरंच बदलता. त्यानंतर असं झालेलं की, अमृताला दिलेले दागिने पुन्हा कधीच येत नाहीत”. अमृताने सांगितलेला हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं.