सध्या सिनेसृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या लग्नाची. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असून यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यांच्या केळवणांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुरुवातीला अमृताच्या आजोबांनी प्रसाद व अमृताच्या केळवणाचा थाट घातला होता. शिवाय रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकारांनीही प्रसाद, अमृताचं केळवण केलं. (Amruta Deshmukh Kelvan Special Ukhana)
नुकतंच अमृताचा भाऊ अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कृतिका देव यांनी ही प्रसाद अमृतासाठी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या मॉडर्न टच असलेल्या केळवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अभिनेता अभिषेक देशमुखला लोकप्रियता मिळाली. सध्या अभिषेक बहिणीच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त आहे. नुकतंच अभिषेकने अमृता व प्रसादला केळवणासाठी घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी मॉडर्न व पारंपरिक अंदाजात हे केळवण केले.
पणत्यांची आरास करत, तसेच रांगोळी काढत पंचपक्वान्नांचा थाट न करता मोमोज, पास्ता खाऊ घातले. शिवाय चौघांनी एकत्र फोटोही काढले. यावेळी अमृताने घेतलेल्या उखाण्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “अभिषेक व कृतिकाने काँटिनेंटल केळवण करून दिलाय आम्हाला पास्ता, संसार सुरु झाला आहे वाटत कारण प्रसादचं नाव घेते खातोय आम्ही खस्ता” असा हटके उखाणा घेत तिने या केळवणाची शोभा वाढविली. अमृताने घेलेला हा उखाणा अनेकांना आवडला असून तिचं कौतुक करत कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना लग्नासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.
‘बिग बॉस’च्या घरामध्ये प्रसाद व अमृतामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रसाद व अमृताच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रसाद व अमृता यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. त्यानंतर थेट साध्या पद्धतीने साखरपुडा सोहळा उरकत त्यांनी त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. आता लवकरचं ही जोडी एकमेकांच्या आयुष्याचे साथीदार बनण्यासाठी सज्ज झाली आहे.