बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. बच्चन कुटुंबाची बरेचदा चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. सध्या अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांची चपळता कायम आहे. दरम्यान, ते त्यांच्या कौटुंबिक संबंधांमुळे चर्चेत असतात. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या कानावर येत आहेत. याच दरम्यान, त्यांची एक जुनी मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती कशी वाटली जाईल याबाबत भाष्य केलं आहे. (Amitabh Bachchan On Property)
आपल्या इच्छेचा संदर्भ देत ते म्हणाले की, मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक यांच्यात समान वाटणी केली जाईल. २०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन म्हणाले होते, “मी एक गोष्ट ठरवली होती की मी त्यांच्यात भेदभाव करणार नाही. जेव्हा मी मरेन, तेव्हा माझ्याकडे जे काही आहे ते माझी मुलगी आणि माझ्या मुलामध्ये समान वाटले जाईल. यांत कोणताही भेदभाव केला जाणार नाही”. हे सर्व त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासह बसून ठरवले असल्याचेही अमिताभ यांनी सांगितले.
अमिताभ म्हणाले, “जया व मी हे खूप आधी ठरवलं होतं. प्रत्येकजण म्हणतात की मुलगी ही परक्याचं धन आहे. ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाते, पण माझ्या नजरेत ती आमची मुलगी आहे आणि तिला अभिषेकचा तेवढाच हक्क आहे”. गेल्या वर्षी अमिताभ यांनी त्यांचा ‘जलसा’ हा बंगला श्वेता बच्चन नंदा यांना भेट म्हणून दिला होता. त्यावेळी त्याची किंमत ५० कोटी रुपये होती. रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड सुपरस्टारच्या कुटुंबाची एकूण संपत्ती १६०० कोटी रुपये आहे. याच संवादात अमिताभ यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनबरोबरच्या नात्याबद्दलही सांगितले.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते अभिषेकला मित्र मानतात. ते म्हणाले, “अभिषेकच्या जन्माआधीच मी ठरवलं होतं की, मला मुलगा झाला तर तो माझा मुलगा नाही तर माझा मित्र असेल. ज्या दिवशी त्याने माझे बूट घालायला सुरुवात केली, तो माझा मित्र झाला. त्यामुळे आता मी त्याला मित्राप्रमाणे वागवतो. मी त्याला मुलगा म्हणून क्वचितच पाहतो. मला त्याची वडील म्हणून काळजीही वाटते, वडिलांप्रमाणे त्याची काळजी घेईन, वडिलांप्रमाणे सल्ला देईन. पण जेव्हा मी त्याच्याशी बोलतो तेव्हा आम्ही मित्रांसारखे बोलतो”.