akshay kumar haunting house : अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये अक्षयचे एक मजेदार पात्र पाहायला मिळणार आहे. अलीकडेच अक्षयने एका मुलाखतीत त्याचा भुतावर विश्वास आहे की नाही याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या जुन्या घरातील एक भितीदायक घटना कथन केली. अक्षयने सांगितले की तो त्या घरात पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगा आरवसोबत राहत होता आणि तिथे काहीतरी आहे असे नेहमी त्याला वाटत होते. अक्षय कुमारने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही एका घरात राहत होतो जिथे माझी पत्नी मला नेहमी सांगायची की इथे काहीतरी गडबड आहे. त्यावेळी माझा मुलगा आरव साधारण चार-पाच वर्षांचा होता”. अक्षय पुढे म्हणाला, “मी तिला म्हणायचो की टीना, तू शिकलेली आहेस, तू असे कसे बोलू शकतेस? पण घरात एका महिलेच्या चालण्याचा आवाज आल्याचे ती सांगत राहिली”.
अक्षयने सांगितले की, तो टीनाचे बोलणे टाळत राहिला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे, पण एके दिवशी त्याचा मुलगा आरवने कोणाकडे तरी हाताने इशारा केला तेव्हा त्याचे भान हरपले. त्या भीतीदायक घटनेची आठवण करुन देत अक्षय म्हणाला, “एक दिवस माझा मुलगा झोपला होता आणि अचानक त्याने कुठेतरी इशारा केला आणि म्हणाला- इथे राहू नकोस, दूर जा, तू इथून निघून जा”. “मी त्याला विचारले तू कोणाशी बोलत आहेस? मलाही काही क्षण धक्का बसला. माझी बायको म्हणाली, बघ, मी तुला सांगितलं, कोणीतरी आहे. तुमचा मुलगाही कोणाशी तरी बोलत आहे. काहीतरी गडबड आहे”.
आणखी वाचा – आत्महत्येनंतर अनुराग डोभालची हॉस्पिटलमधून पहिली पोस्ट, बेडवरचा फोटो शेअर करत म्हणाला, “मी आज अनाथ आहे”
अक्षयचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. अक्षय पुढे म्हणाला की, तो अजूनही तर्कावर विश्वास ठेवतो, पण त्या घटनेमुळे त्याच्या मनात थोडी शंका निर्माण झाली होती. त्या दिवशी त्याने हे मान्य केले की भूत असतात आणि नक्कीच काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते, जी त्यावेळी त्याच्या घरातही होती. तो म्हणाला, ‘माझा अंदाज आहे की कदाचित अशा गोष्टी अस्तित्वात असतील, कुठलीतरी अलौकिक शक्ती किंवा ऊर्जा असेल. लोक म्हणतात की काही लोक सकारात्मक उर्जेने वेढलेले असतात, तर काही लोक नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. आपल्या आजूबाजूला नेहमीच एक प्रकारची ऊर्जा असते.
आणखी वाचा – भारतात LPG गॅसचा तुटवडा, दररोज किती होतो वापर?, जाणून घ्या सविस्तर…
मुलाखतीत अक्षयने दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करण्याबाबतही सांगितले. या दोघांनी आतापर्यंत ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘गरम मसाला’ आणि ‘खट्टा मीठा’ सारखे चित्रपट केले आहेत. आता हे दोघेही ‘भूत बंगला’ घेऊन एकत्र आले आहेत. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, असरानी, वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि प्रियदर्शनची जोडी १६ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.





