Gashmeer Mahajani New Song : गावोगावी फिरुन आई जगदंबेचा जागर करणारे गोंधळी म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यांची भक्ती, त्यांची ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करते. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना दिसणार आहे.
‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ ।
अंधार मातला थोर, असा घनघोर, लागला घोर गं जगदंबे ।
या गोंधळ नृत्यात गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोलीसह कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे.
नुकतेच हे गोंधळ गीत प्रकाशित झाले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. जगदंबेचा हा गोंधळ कथानकात थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर रहस्यमय वातावरणात गश्मीरची एन्ट्री वेगळीच रंगत वाढविणारी आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेल्या या गोंधळाला संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचा संगीतसाज आहे. अजय गोगावले यांचा दमदार स्वर गाण्याला लाभला आहे. हा गोंधळ आशिष पाटील यांनी आपल्या सदाबहार अदाकारीने नृत्यदिग्दर्शित केला आहे.
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)
गावातील गूढ शांततेच्या आड दडलेलं जीवघेणं रहस्य उलगडण्यासाठी हा गोंधळी येतोय का? अशा प्रश्नांची उत्सुकता यामुळे निर्माण झाली आहे. याबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणतो, ‘गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची एक ऊर्जादायी अभिव्यक्ती आहे’. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी हा कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतामध्ये असलेली ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण यामुळे शूटिंग करतानाच अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल.”
आणखी वाचा – ‘कलर्स मराठी’वरील ही मालिका होणार बंद; मुख्य अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “Goodbye…”
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा थरारक शोध घेणारा ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.





