आई मुलाचं नातं हे कोणत्याही इतर नात्यापेक्षा हळवं असं असलेलं नातं आहे. या नात्याला जगात तोड नाहीच. या नात्याची किंमत प्रत्येकाला आहे. मात्र आई आपल्या जोवर सोबत आहे तोवर तिची विशेष अशी किंमत कळत नाही, आणि ती हे जग सोडून गेली की, आपल्याला तिची आठवण येते, तिची किंमत कळते. अशीच कलासृष्टीतील सर्वांची लाडकी माय साऱ्यांना सोडून गेली, ती म्हणजे अभिनेत्री सीमा देव. अत्यंत जवळ, सुशील अशी अभिनेत्री म्हणजे सीमा देव. अल्झायमर्स या आजाराने ग्रस्त असलेल्या सीमा देव यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अजिंक्य देव, अभिनय देव, दोन सुना, नातवंडं आहेत. आईच्या मृत्यूनंतर अभिनेते अजिंक्य देव भावुक असलेले पाहायला मिळतात. (Ajinkya Deo Emotional Post)
गेल्या काही दिवसांपासून आईच्या आठवणींमध्ये ते सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट शेअर करत आहेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या आठवणीत एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आई सीमा देव यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेते अजिंक्य देव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून त्यांनी सीमा देव यांच्यासाठी एक चारोळी सादर केली आहे. “भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही.” ही चारोळी सादर करतानाचा व्हिडीओ शेअर करत अजिंक्य देव यांनी कॅप्शनमध्ये “आई” असं लिहीलं आहे.
अजिंक्य देव यांच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “दादा, आई-बाबा हे खरं पाहता आपलं अख्ख विश्व असतं. त्यांचे हात जरी डोक्यावर असले तरी लढण्याचं बळ मिळतं. त्यांची शिकवण, संस्कार आणि आईच्या आठवणी हीच तर आपल्या आयुष्यभरची खरी पुंजी असते. आणि ताई आम्हाला पण आई समानच आहेत. त्या नेहमी तुमच्याबरोबर असतील” तर तर आणखी एका चाहत्याने लिहीलं आहे की, “ती फक्त तुझीच आई नव्हती….ती आमच्या पिढीतील सर्वांची माऊली होती…. त्या माऊलीनं त्यांच्या अभिनायातून कधीच कुणाला आई, बहिणीची, माया कमी होऊ दिली नाही.”