एखाद्या कथेत नायक व नायिका जितकी महत्त्वाची असते. तितकाच किंबहूना त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे खलनायक. खलनायकाशिवाय एखाद्या कलाकृतीची कल्पना करणंही हे अवघडच असतं. अशीच खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या रुपाली ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ऐश्वर्या यांची रुपाली व विरोचकाची अत्यंत विकृत भूमिका दाखवण्यात आली आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत विरोचक शत्रुंचा वध करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र हेच काही प्रेक्षकांना आवडत नाही. प्रेक्षकांसह ऐश्वर्या यांच्या आईलाही रुपालीची ही भूमिका आवडत नसल्याचे ऐश्वर्या यांनी सांगितले आहे. ऐश्वर्या यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील “रुपाली ही भूमिका त्यांच्या आईला आवडते का?, रुपाली या भूमिकेबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात?” असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देत ऐश्वर्या यांनी असं म्हटलं की, “मालिकेत मी कुणाला मारत असेल तर किंवा मला कुणी मारत असेल तर आई टीव्ही बंद करते. त्यामुळे आई-बाबा ही मालिका बघत नाहीत. या मालिकेत माझी भूमिका ही खूपच आक्रमक व विकृत दाखवली आहे. त्यामुळे ती ही मालिका बघत नाही. तसेच ही मालिका रात्री साडे दहा वाजता लागत असल्याने आई-बाबा जागे राहत नाहीत”.
दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत त्यांनी अद्वैत म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेची आई रुपाली म्हात्रेची (विरोचक) भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता या भूमिकेद्वारे त्यांना ओळखलं जात आहे.