aishwarya narkar post : डिजिटल युगात सध्या स्कॅमचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. सामन्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांना फसवणुकीचा अनुभव येत आहे. आणि याबाबत ही मंडळी सोशल मीडियावर पोस्ट करत इतरांना जागरुक करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या पत्नीसह हा फ्रॉड घडला. याच पाठोपाठ आता एका लोकप्रिय अभिनेत्रीलाही फ्रॉड कॉल आला असल्याचं तिने इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे सांगितलं. महानगर गॅस मधून हा फ्रॉड कॉल आला असल्याचं ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं. घडलेला प्रकार सांगत त्यांनी चाहत्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सावध केल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या म्हणाल्या, “एका स्कॅममधून देवाच्या कृपेने वाचली आहे. म्हणून तुमच्यासोबत शेअर करतेय. ४-५ दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअॅपवर महानगर गॅसकडून मॅसेज आला होता. तुमच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला आहे तर तुमचा गॅस आज संध्याकाळी कट केला जाईल. मला एक विचार आला की, बिलची हार्ड कॉपी आली की मी लगेच भरुन टाकते. त्यामुळे बिल पेंडिंग असण्याचा काही संबंधच नाही. मी त्यांना मॅसेज केला की, मला बिल मिळालेलंच नाही. तर त्यांचा मला व्हॉट्सअॅप कॉल आला. त्यांचा लोगो वगैरे असल्याने ते ऑथेंटिक वाटत होतं. मी त्यांना सांगितलं की, तुमची हार्ड कॉपी आलेली नाही. मी आत्तापर्यंतची तुमची सगळी बिलं भरली आहेत. तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय बंद करु शकता?”
पुढे त्या म्हणाल्या, “तर त्यांचा माणूस म्हणाला की बिल भरण्यासाठी हे नाही. तर आम्ही सॉफ्टवेअर अपडेट करतोय. आणि त्या सॉफ्टकॉपी येण्यासाठी तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाही आणि त्यासाठी तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. मी त्यांना म्हटलं की हा मुद्दा मला कळत नाही आहे. तर त्याने सांगितलं की काही हरकत नाही. मी तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यावर तुम्ही क्लिक केलं की, तुमचं अपग्रेडेशन होईल आणि कनेक्शन बंद होणार नाही. हा फ्रॉड कॉल आहे, हे मला समजतच नव्हतं. त्यांनी जी फाइल पाठवली ती apk फाइल होती. हे मी ऐकलं होतं की, apk फाइल या स्कॅमच्या फाइल असतात. त्याने मला सांगितलं की यावर क्लिक करुन मी सांगतो तसे डिटेल्स भरा. पण माझा आयफोन असल्याने त्या फाइलवर क्लिकच होत नव्हतं”.
आणखी वाचा – विजय देवरकोंडा इंस्टाग्रामवर बायकोला करत नाही फॉलो, लग्नानंतर सुरु झाल्या चर्चा, मात्र रश्मिका…
शेवटी हा प्रकार पुढे नेत त्या म्हणाल्या, “मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला वेबसाइट सांगा. तिथे काय करायचंय ते आम्ही करतो. तर त्याने मला विचारलं की तुमचा कुठला फोन आहे. मी त्याला सांगितलं की आयफोन आहे. मग त्याने मला सांगितलं की, अँड्रॉइड फोनमधून ओपन करा. मग मला शंका आली. मी त्याला म्हटलं की जे काही करायचंय ते मी ऑफिशियल वेबसाइटवर करेन. असं म्हटल्यावर त्याने कॉल कट केला. मला एवढंच सांगायचं आहे की असा कुठला बँकिंग किंवा इतर कुठलाही फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेचच कोणतीही अॅक्शन करु नका. थोडा विचार करा. हे सगळे मोठे स्कॅम सुरु आहेत. यातून तुम्ही नक्कीच वाचू शकता. आपल्याला कळत नाही की, आपण कोणत्यातरी स्कॅममध्ये फसतो आहोत, त्यामुळे प्रत्येकवेळी थोडा विचार करा”, असं म्हणत ऐश्वर्या यांनी चाहत्यांना आवाहन केलं आहे.





