गेल्या काही दिवसांपासून अवघ्या मनोरंजन सृष्टीमध्ये फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तो चित्रपट म्हणजे अॅनिमल. अॅनिमल या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्डस मोडले असून अजूनही हा चित्रपट तुफान गाजत आहे. चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ७०० कोटींच्यावर कमाई केली आहे. या चित्रपटाशिवाय यातील गाणीही चांगलीच गाजत आहेत. चित्रपटातील अनेक प्रेमगीतांसह इतर गाणीही चांगलीच गाजत आहेत. चित्रपटातील बॉबी देओलच्या एन्ट्रीचं ‘जमाल जमालो कुडू’ हे गाणं तर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या गाण्यावर अनेकजण रील व्हिडीओ बनवत आहेत. (Avinash Narkar On Instagram)
अशातच या गाण्यावर आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अविनाश व ऐश्वर्या नारकरांनी जबरदस्त डान्स केला आहे. अविनाश-ऐश्वर्या ही मराठीतील लोकप्रिय जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करून ते दोघंही त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. अशातच नारकर जोडप्याने ‘जमाल कुडू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्याबरोबर अभिनेत्री अश्विनी कासारही आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्…
या व्हिडीओला त्यांनी “आम्ही आनंदी असल्यामुळे डान्स करत आहोत” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या, अविनाश व अश्विनी हे तिघेही उत्तम डान्स स्टेप्स करत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सगळं लक्ष अविनाश नारकर साहेबांनी वेधून घेतलं, ऐश्वर्या-अविनाश यांच्या स्टेप्स एकदम परफेक्ट आहेत, तिघेही छान नाचले, तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप छान एक्सप्रेशन्स दिले, खूप छान, एकदम भारी” अशा अनेक प्रतिक्रिया देत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, अविनाश-ऐश्वर्या हे सध्या छोट्या पडद्यावरील मालिकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अविनाश हे सन मराठीवरील ’कन्यादान’ व ऐश्वर्या नारकर या जी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात.