Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांनाच वेड करुन सोडलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक म्हणजेच कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. पुरुषोत्तम दादा पाटील यांना पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराला राम राम करावा लागला. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात कोणताही स्पर्धक नॉमिनेट झाला नाही त्यामुळे साऱ्यांच्या नजरा तिसऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशनकडे लागून राहिल्या होत्या. तिसऱ्या आठवड्याच्या या नॉमिनेशन प्रक्रियेत सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निखिल दामले आणि योगिता चव्हाण ही स्पर्धक मंडळी होती.
एकूणच स्पर्धकांच्या मानेवर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळाली. घराबाहेर नेमका कोणता स्पर्धक जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या असताना सर्वप्रथम निखिल दामलेला ‘बिग बॉस’मराठीचा हा खेळ सोडावा लागला. मात्र काही वेळाने पुन्हा एकदा नॉमिनेशन प्रक्रिया करण्यात आली आणि प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला. या नॉमिनेशन प्रक्रियेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिचं नाव घेण्यात आलं. त्यामुळे योगितालाही ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपवून घराबाहेर पडावं लागलं.
‘बिग बॉस’च्या घरात गेले दोन आठवडे योगिताने खेळलेला खेळ पाहून प्रेक्षक मंडळींनी योगिताच्या एक्झिटवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. योगिता उत्तम खेळ खेळत होती, निक्की व जान्हवी दोघींनाही तिने एकटीनं धडा शिकवला त्यामुळे तिचं खूप कौतुक होत होतं. योगिताने हा खेळ खेळायला हवा होता. ती फिनालेपर्यंत नक्की पोहोचली असती, असं म्हणत अनेकांनी तिची स्तुती केली आणि योगीताने या घरात पुन्हा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री घ्यावी अशी इच्छाही व्यक्त केली आहे.
“योगिता छान खेळत होती. त्या पुढारीला वाचवण्यासाठी योगितावर अन्याय झाला. तो छोटा पुढारी राजकारन्यांच्या नावावर् कलंक आहे”, “वाइल्ड कार्ड म्हणून परत योगिताची एण्ट्री करा”, “आम्हाला योगिता पुन्हा हवी आहे. ती खूप चांगली आहे”, “योगिताचा गेम आवडला होता. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये अपेक्षा होती पुढे चांगलं खेळेल पण ठीक आहे”, “योगिता तू जायला नको होतं”, “घनःश्यामला वाचवण्यासाठी योगितावर अन्याय केला”, अशा अनेक कमेंट योगितासाठी प्रेक्षकांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत.