सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. प्रगत तंत्रज्ञान एकप्रकारे लोकांच्या जीवनात येत आहे, पण त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. एखाद्याचा आवाज वा फोटो मॉर्फ करण्यासाठी अनेक लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI)चा गैरवापर करताना दिसत आहेत. अशातच सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळीही या डीपफेक व्हिडीओचे शिकार झाले आहेत. काही दिवसांपासून या कलाकारांच्या डीपफेक व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. (Priyanka Chopra Deepfake Video)
रश्मिका मंदान्ना ते आलिया भट्ट, कतरिना कैफ, काजोल यांसारखे मोठे स्टार डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. यानंतर आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. एका ब्रँडची जाहिरात करत असताना तिच्या या मुलाखतीचा हा मॉर्फ केलेला व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
प्रियांका चोप्राचा डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र प्रियांकाच्या या व्हिडिओमध्ये इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रियांकाचा चेहरा बदललेला नसून तिच्या आवाजाशी छेडछाड करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या तोंडून वेगळंच बोलणं ऐकू येत आहे, हे सर्व एआयच्या मदतीने करण्यात आलं आहे. तिचा आवाज तसेच तिचे संवाद या बनावट ब्रँडच्या जाहिरातींसाठी बदलल्या आहेत. या बनावट क्लिपमध्ये प्रियांका तिची वार्षिक कमाई उघड करण्याबरोबरच एका ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा म्हणत आहे, ‘सर्वांना नमस्कार, माझे नाव प्रियांका चोप्रा. मी एक मॉडेल, अभिनेत्री व गायक आहे. २०२३ मध्ये मी १ हजार लाख रुपये कमावले आहेत. चित्रपट, गाण्यांव्यतिरिक्त मी इतर गुंतवणूक प्रकल्पांमध्येही योगदान दिले आहे. मी माझी मैत्रीण रुची भल्ला हिला हा प्रकल्प सुचवू इच्छिते. तुम्ही दर आठवड्याला ३ लाख रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला त्याचे टेलिग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करण्याची गरज नाही” असं बोलतानाचा प्रियांकाचा हा व्हिडीओ समोर आला आहे.