यंदाचं ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरलं, तर अभिजीत सावंत हा उपविजेता ठरला. सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील सगळेच स्पर्धक चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’मराठीच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळीची चर्चा रंगली. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून ते अगदी घराबाहेर येईपर्यंत निक्कीची हवा असलेली पाहायला मिळाली. याशिवाय निक्की चर्चेत आली ती म्हणजे तिच्या अरबाजबरोबरच्या नात्यामुळे. अरबाज व निक्की यांचं नातं हे विशेष चर्चेत आलेलं दिसलं. सर्वत्र त्यांच्या या नात्याची चर्चा सुरु आहे. (Nikki Tamboli reveal relation with Arbaaz Patel)
‘बिग बॉस’च्या घरात असताना निक्की व अरबाज यांच्यात सुरुवातीला झालेली मैत्री व कालांतराने त्यांच्यात फुलत गेलेलं प्रेम यामुळे ही जोडी चर्चेत आली. अरबाज व निक्कीमध्ये मोठी भांडणही झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. आणि त्यांच्यातील जवळीकीची मोठी चर्चा झाली. आता घराबाहेर आल्यानंतरही निक्की व अरबाज एकत्र फिरताना दिसले. तसेच एकमेकांना ते वेळ देताना दिसले. यामुळे आता निक्की व अरबाज एकत्र येणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.
आणखी वाचा – “निक्कीमुळेच माझी दुसरी बाजू समोर आली”, अरबाज पटेलचं वक्तव्य, आकंठ प्रेमात, म्हणाला, “माझ्या भावना…”
दरम्यान, अरबाजच्या भूतकाळामुळे अनेकांनी दोघांच्या या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. अरबाज बिग बॉसमधून बाहेर आला आणि त्याने निक्कीसाठी आधीचे नाते संपवल्याचेही म्हटलं. त्याने निक्कीची समजूतही काढली. यावर निक्कीनेदेखील त्याचा स्वीकार केल्याचे भाष्य बिग बॉसच्या घरात केले. यानंतर आता नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत निक्कीने अरबाजबरोबरच्या नात्याबाबत केलेलं भाष्य लक्ष वेधून घेत आहे. निक्कीने म्हटलं की, “सध्या सर्वत्र चर्चा आहे म्हणून आम्ही एकत्र नाही आहोत. तर चर्चा व्हाव्यात अशी आमची मैत्री आम्ही निर्माण केली. आमचं कनेक्शन पाहिलं तर अगदी पहिल्या दिवशी स्टेजवरचं आमचं eye contact सुरु झालं. त्यामुळे चर्चा ही आमचीच तयार केली आणि चाहत्यांनी पाठिंबा दिला म्हणून त्याची अधिक चर्चा झाली. याचं क्रेडिट मी चाहत्यांना देते, कारण त्यांनी आम्हाला ओळखून पाठिंबा दिला. हे सगळं खरं आहे”.
पुढे निक्की म्हणाली, “पार्टनर होणार की नाही याचं उत्तर मी आता देत नाही, कारण आम्ही एक दुसऱ्यांना अजून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण, ७० दिवस आम्ही एकत्र होतो तेव्हा आम्ही एकमेकांना समजून घेतलं असलं तरी तिथे गेम हा खेळायचा होता. यावेळी त्याने कायम मला पाठिंबा दिला. अरबाज थोडा रागीट आहे, त्यामुळे मी त्याला वेळोवेळी शांत केलं आहे. अरबाज हा खूप मेहनती मुलगा आहे. आणि त्याने मला त्याच्या भूतकाळाविषयी सांगितलं आहे, आणि मी ते स्वीकारलं आहे. एखाद्याची मैत्री स्वीकारायची ठरवली तर आपण त्याला पूर्णतः स्वीकारणे आवश्यक असते. तरच एक चांगली व्यक्ती आहोत असं आपण सिद्ध करु शकतो”.