Abhijeet Sawant video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. अभिजीत हा ट्रॉफीचा खरा मानकरी होता असं म्हणत अनेकांनी तो उपविजेता होताच नाराजी दर्शविली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ७० दिवस gentlemen म्हणून वावरलेल्या अभिजीतचा हा प्रवास वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक टास्कमध्ये प्लॅन करत अभिजीत उत्तम खेळ खेळताना दिसला. ‘बिग बॉस’च्या घरातून उपविजेतेपद घेऊन बाहेर येताच सर्वच क्षेत्रातून त्याचं भरभरुन कौतुक केलं जात आहे. त्याच्या घरीही त्याच्या कुटुंबियांकडून जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
विजेतेपद हुकल्याबाबत अभिजीतनेही नाराजी दर्शविली. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून अभिजीतने स्वतःच डोकं लावून खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला शांत दिसणारा अभिजीत कालांतराने बदलत त्याची युक्ती लावून खेळताना दिसला. अभिजीतला ‘बिग बॉस’च्या घरात खेळतानाही दुखापत झालेली पाहायला मिळाली. टास्कदरम्यान त्याच्या हाताच्या बोटाला तसेच पायालाही दुखापत झाली. तरीसुद्धा अभिजीत तितक्याच जिद्दीने प्रत्येक टास्क खेळताना दिसला. अभिजीतच्या या जिद्दीचं त्याच्या चाहत्यांकडून वेळोवेळी कौतुकही करण्यात आलं. शिवाय ‘बिग बॉस’ यांनीही अभिजीतला त्याची काळजी घेऊन खेळण्याचा सल्ला दिला. इतकंच नव्हे तर घरातील सर्व स्पर्धकही अभिजीतची काळजी घेताना दिसले.
आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही अभिजीतच्या हाताचं बँडेज काढण्यात आलं नव्हतं. आता अखेर हाताचं बँडेज काढायला अभिजीत हॉस्पिटलला गेला असल्याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या पत्नीसह हॉस्पिटलला गेलेला दिसत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्या बोटाला लावण्यात आलेलं स्टॅन्ड काढण्यात आलं. यावेळी अभिजीतला फार दुखतही होतं. “ही बंदूक आज मी माझ्या बोटातून काढून टाकणार आहे”, असं अभिजीत या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
बँडेज व स्टँड काढल्यानंतर अभिजीत पुन्हा ड्राइव्ह करत घरी जाताना दिसत आहे. यावेळी त्याने त्याला दुखत असल्याचंही म्हटलं. “‘बिग बॉस’च्या घरात असल्यापासून संभाळून ठेवलेली ही बंदूक अखेर माझ्या हातातून काढून टाकलेली आहे”, असं म्हटलं आहे. अभिजीतच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे.