महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं व महत्त्वाचं नाव म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले विलासराव देशमुख आजही अनेकांच्या लक्षात आहेत. राजकारणातले राजहंस अशी ओळख असणाऱ्या विलासराव देशमुख यांची भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची सामान्यांना भुरळ पडत असे. विलासराव देशमुख हे विरोधी पक्षातही लोकप्रिय होते. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदापासून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या विलासरावांनी मुख्यमंत्री पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला. विलासराव देशमुख म्हणजे काँग्रेसचे स्टार प्रचारक. एकहाती सभा खेचून आणण्याचे त्यांचे कौशल्य होते. (Riteish Deshmukh wished his brothers Amit and Dheeraj)
विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख व धीरज देशमुख ही त्यांची मुलं त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित २००९ पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. अमित व धीरज यांच्याप्रमाणे विलासरावांचा चिरंजीव रितेश देशमुख राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्यांचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत आणि आपल्या दोन्ही भावांना रितेश कायमच साथ देत आला आहे.
आणखी वाचा – “काय दिवे लावणार कुणास ठाऊक?”, पत्नीने कुशल बद्रिकेला चिडवलं, अभिनेताही म्हणाला, “संध्याकाळी…”
आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अमित व धीरज उतरले आहेत. अमित आणि धीरज या देशमुख बंधूंना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने रितेशने दोघांना पाठिंबा दिला आहे. तसेच आपल्या दोन्ही भावांना त्यांनी यानिमित्ताने शुभेच्छाही दिल्या आहेत. अमित व धीरज यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी दोघांबरोबर त्यांची आईही होती. हाच फोटो रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा अमित व धीरज भैय्या”.
आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”
दरम्यान, लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपाने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे लातूरमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.