सिनेसृष्टीत आजवर असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काऊचसारखा अनुभव आला आहे. अनेक अभिनेत्रींना या भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले आहे. अनेकांनी या प्रसंगावरून भाष्य केलं आहे तर काहींनी हा अन्याय सहन केला आहे. अशातच आता या भयानक प्रसंगाला सामोऱ्या गेलेल्या काही अभिनेत्री याबाबत वाचा फोडण्यास पुढे सरसावत आहेत. दरम्यान एका अभिनेत्रीने खुलासा करत, तडजोड करण्यास नकार दिल्याने तिला थेट सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं. (Aditi Govitrikar On Casting Couch Experience)
ही अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. सुपरमॉडेल व अभिनेत्री म्हणून नावारूपास आलेल्या अदितीने सिनेसृष्टीत बरंच काम केलं आहे. फॅशन, मॉडलिंग तसेच अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरच्या मोहक सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही अदिती तितकीच फिट व सुंदर दिसते. एव्हरग्रीन अदितीने मिस वर्ल्डचा देखील किताब पटकावला आहे. अदितीची ड्रेसिंग स्टाइल, तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणं अशक्य.
अशातच अभिनेत्री अदितीने तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत घडलेला प्रकार सांगत अदिती म्हणाली, “मी एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती मला तडजोड करण्यास सांगत होती मात्र मला ते कळलं नाही. तो असं बोलताच मी त्याच्या तोंडावर हसले आणि तिथून निघून गेले. तू वेडा आहेस का की मूर्ख आहेस? असं काही तरी बोलून मी निघून गेले आणि यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने दुसऱ्या दिवशी मला व माझ्या टीमला पॅकअप करून मुंबईला परत पाठवलं. मला तर समजलंही नाही की नेमकं काय घडलंय” असं अभिनेत्री म्हणाली.
यापुढे अभिनेत्री म्हणाली, “मग मला मीटिंगसाठी बोलावण्यात आलं कारण आम्ही तीन-चार दिवस शूटिंग केलं होतं. मीटिंगमध्ये त्यांनी मला चित्रपटातून काढण्याची अगदी फालतू कारणं दिली. सगळी कारणं खोटी होती. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं का घडलं, मी तडजोड करायला नकार दिल्यामुळेच मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं,” असं अदितीने सांगितलं.