Actor Atul Parchure Died : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी कॅन्सरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते.
कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क दादर हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना तसेच कलाविश्वात कलाकारांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यावेळी अभिनेते महेश मांजरेकरही उपस्थित होते.
महेश मांजरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, “आम्ही खूप वर्षांपासून एकत्र होतो. आमच्या आयुष्याच्या करिअरची सुरुवात आम्ही एकाच स्टेजवर, एकाच नाटकातून १९८४ साली सुरु केली. उत्तम नट आणि तो माझा मित्र होता. जवळपास ४० वर्षे आम्ही एकत्र होतो. त्याच्या संपूर्ण प्रवासात मी होतो. हल्लीच इलेक्शनचा रिझल्ट जाहीर झाला तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळेला नवा प्रोजेक्ट सुरु करायचा यावर चर्चा झाली. आता तो प्रोजेक्ट राहिला. वाईट वाटतं. आम्ही एकत्र काम नाही केलं तरी आम्ही भेटत असतो. हे खूप वाईट झालं. महिन्याभरापूर्वी तो नाटकाची रिहर्सल करत होता, आणि अचानक असं झालं हे खूप धक्कादायक आहे”.
तर विजय पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, “अनेक धक्के आम्ही सहन करतोय. विजय कदम, त्याच्यानंतर अतुल परचुरे. आमच्या पिढीतले पु.ल. देशपांडे गेले. खूप चांगला नट, खूप चांगला मित्र आणि खूप चांगला माणूस ज्याच्याबरोबर मी खूप काम केलं आहे. अतुल तुझ्या आत्म्यास शांती लाभो”.