एकटेपणा नक्की काय असतो? हे ज्याने अनुभवलं त्यालाच याचा खरा अर्थ कळाला. बऱ्याचदा पैसा, श्रीमंती, प्रसिद्धी हाताशी असतानाही कलाकारांना एकटेपणाचा सामना करावा लागतो. मध्यंतरी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या सासू म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह यांनी एकटेपणा काय असतो? याचं तंतोतंत वर्णन केलं होतं. त्यांनी बालपणापासून ते आतापर्यंत एकटेपणा अनुभवला आहे आणि आजही अनुभवतात. असाच एकटेपणा इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या वाट्यालाही आला आहे. वयाची ७५ ओलांडल्यानंतरही उषा काम करत आहेत. त्यांच्या एनर्जीचं करावं तितकं कौतुक कमीच. मात्र घरी गेल्यानंतर एकही माणूस वाट बघायला नाही याचं त्यांना दुःख आहे. (usha Nadkarni ankita lokhande)
उषा यांनी त्यांच्या एकटेपणाबाबत उघडपणे भाष्य केलं. यावेळी आयुष्य कसं जगत आहे? हे सांगताना त्यांना अश्रूही अनावर झाले. अंकिता लोखंडेला इंडस्ट्रीमध्ये १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्त तिने मुंबईतील राहत्या घरी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अंकिताने उषा यांनाही बोलावलं होतं. अंकिताचा मान राखत त्या पार्टीला हजरही राहिल्या. याचसंदर्भातील एक व्लॉग अंकिताने सगळ्यांबरोबर शेअर केला आहे.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये उषा व अंकिताने एकत्रित काम केलं. याच मालिकेचं छोटसं रियुनियन अंकिताच्या पार्टीमध्ये पाहायला मिळालं. यावेळी उषा यांनी ७९व्या वर्षीही मुंबईत एकटं राहण्याबाबत सांगितलं. त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. उषा म्हणाल्या, “घरी मी एकटीच असते ना. भीती वाटते मी घरात कुठे पडली तर काय होईल?. मला काय झालं तर कोणाला कळणारंही नाही. गेल्यावर्षी ३० जूनला माझ्या भावाचं निधन झालं. मी कोणत्या अडचणीमध्ये असली आणि त्याला याबाबत कळालं तर तो धावत माझ्यासाठी यायचा. आता मी कोणाला सगळं सांगू?”. हे सगळं बोलत असतानाच त्यांना अश्रू अनावर झाले.
आणखी वाचा – दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, सर्जरीसाठी रुग्णालयात जाताना नवऱ्याने हात जोडले अन्…; परिस्थिती अशी की…
यावेळी अंकिताने उषा यांना सावरलं. ती म्हणाली, “आई खूप हिंमती आहे. ती एकटीच राहते. कित्येक वर्ष ती एकटीच राहत आहे. मी खूप वर्ष आईला बघत आली आहे”. यावेळी अंकिताने प्रेमाने उषा यांच्यासाठी जेवण बनवलं होतं. त्यांना प्रेमाने खाऊ घातलं. उषा यांचा मुलगाही त्यांच्याजवळ राहत नाही. या व्लॉगमध्ये त्यांनी याबाबतही भाष्य केलं. त्यामुळे कुटुंबाचं प्रेम त्यांना या वयात मिळणं अपेक्षित होतं त्यापासून त्या दूर आहेत. अंकिता, तिचा नवरा विकी जैन आणि अंकिताच्या आईने उषा यांना भरभरुन प्रेम दिलं. इतकंच नव्हे तर कधीची गरज लागली तर फोन करा आम्ही हजर असणार असा शब्द अंकिताने उषा यांना दिला.