सध्या महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णत: बदलले असून सध्याच्या राजकारणावर विरोधकांसह सामान्य नागरिक व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात कलाकारदेखील मागे नाहीत. एरव्ही चाहत्यांच्या व समर्थकांच्या ट्रोलिंगमुळे राजकारण या विषयावर बरेच कलकार मंडळी त्यांची राजकारणाविषयी वा एखाद्या नेत्याबद्दल त्यांची मतं व्यक्त करणे टाळतात. पण काह असे कलाकार आहेत, जे ट्रोलिंग किंवा विरोधाला न जुमानता व्यक्त होतात, यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत.
मराठी नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा विविध माध्यमांत अभिनय करत तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उद्योजिकादेखील आहे. आपल्या अभिनयाने व विविध कलाकृतींची निर्मिती करत कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री तिच्या बेधडक व्यक्तव्यांमुळेदेखील चांगलीच चर्चेत राहत असते. अशातच तेजस्विनीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात राज ठाकरे असं म्हणतात की, “आपण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला भारतीय होतो. “१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला माणूस भारतीय होतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी गेली की तो बंगाली, गुजराती, तामिळ सर्वकाही होतो. मग एके दिवशी तो जेव्हा मराठा होतो तेव्हा मराठा, ब्राह्मण, कुणबी, कोळी असा सगळा होतो. ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’ सारखे आपणही हे वाटून घेतले आहेत. दंगलीत ‘हिंदू डे’, १५ ऑगस्ट-२६ जानेवारीला ‘भारतीय डे’, एरव्ही ‘मराठी डे’ आणि झालाच तर आमच्या ‘जातीचे डे’… आपल्याला एक ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर मला वाटतं ती आपली मराठी भाषा”
आणखी वाचा – ‘बिग बॉस’मुळे फक्त फेमच नव्हे तर विकी जैनने कमावले इतके रुपये, बायकोमुळे नावारुपाला आला अन्…
मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे राज ठाकरेंचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओखाली “छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्मापलीकडे एकत्र बांधलेल्या रयतेची वज्रमूठ कोण कमकुवत करतंय?”, असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हाच व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीने “हा माणूस कधी कळेल महाराष्ट्राला?” असं म्हटलं आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चांगलीच लक्षवेधी ठरत आहे.
आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध गायकाचा परदेशात भीषण अपघात, भररस्त्यात कार उलटली अन्…; भयानक व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, याआधी तेजस्विनी तिच्या राजकीय मतांविषयी अनेकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोलबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच अनेक मुलाखतींमधून राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत असं मतही तिने व्यक्त केले होते. अशातच तेजस्विनीने राज ठाकरेंविषयी केलेल्या व्यक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.