Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ सुरु झाल्यापासून याची सर्वत्र एक वेगळीच हवा पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळींनाच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर, रॅपर, गायक अशा विविध क्षेत्रातील कलेला मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदाच्या या पर्वातील चर्चेत असलेला एकमेव स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण. टिक टॉकच्या दुनियेत पहिल्या दहाच्या यादीत असलेल्या सूरजला ‘बिग बॉस मराठी’ने खूप मोठी संधी दिली आहे. सूरजच्या यंदाच्या पर्वातील खेळाने महाराष्ट्राला वेड केलं आहे. सूरजने जपलेल्या माणुसकीचं सर्व महाराष्ट्र कौतुक करत आहे तर काही स्पर्धकांनी माणुसकीच गमावली म्हणून त्यांना ट्रोल केलं जातं आहे. माणुसकी गमावलेल्या स्पर्धकांमध्ये एक नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर. प्रेक्षकांच्या मनात जान्हवीबद्दल राग दिसत आहे. सोशल मीडियावर ही जान्हवीला बऱ्यापैकी ट्रोल केलं गेलं.
अशातच सूरजला पाठिंबा देण्यासाठी आणि जान्हवीला सल्ला देण्यासाठी एका मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ च्या स्पर्धक लावणीक्वीन सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. जान्हवीला तिच्या उद्धट स्वभावामुळे त्यांनी चांगलेच खडे बोल लगावले आहेत. ‘बिग बॉस’च्या तिसर्या पर्वामध्ये घरामध्ये स्पर्धक म्हणून लावण्यवती आणि विविध मालिकांमधून खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांना पहायला मिळालं.
सुरेखा कुडची यांनी लावणीच्या माध्यमातून आपला कलाक्षेत्रातील प्रवास सुरु केला असला तरी गेल्या दोन दशकांमध्ये विविध मालिका आणि मराठी चित्रपटांतून त्या आपल्याला खाष्ट सासूच्या भूमिकेमध्ये पहायला मिळाल्या आहेत. अशा या मालिकाविश्वातील खाष्ट सासूने जान्हवीला सुनावलं असून सूरजला आईची माया दिली आहे. सुरेखा यांनी पहिली पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजचा एपिसोड पाहिला. पॅडीला हार्ट नाही दिलं हे जरा चुकीच नाही वाटलं का?. असो पण सूरज. वाह तू म्हणालास की आईची कमी भासते. मुलांना जन्म दिल्या नंतर आई गेली तर त्या मूलांना आईच प्रेम नाही मिळत. मी समजू शकते तुझ्या भावना. तुझं बोलण ऐकत असताना तिथे येऊन तुला मायेन जवळ घ्याव असं वाटलं. तू आज मन जिंकलस. कायम असंच रहा आणि खूश रहा”.
तर पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “जान्हवी की कोण आहे ती तिला तर विजयी घोषित करा. कारण घरातील सोडून बाकी मुर्ख, बेअक्कल, निर्लज, बिनडोक आहेत. सगळ्यांना ती घराबाहेर काढणार म्हणते तिला बिग बॉस यांनी विशेष अधिकार दिलेत का?. शी”. पुढे आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी, “नादी लागू नका, खोटारड्या, मुलांसमोर केस उडवत येण, घाणेरडी एक्टिंग, घाणेरड तोंड, ओवर एक्टिंग, पुरस्कार देणाऱ्याला पच्छाताप होत असेल वर्षा उसगांवकरला का घेतलं म्हणून. अशी भाषा चालते?. मराठी माणूस ते खपऊन घेईल?. आजचा क्लायमॅक्स”, असं म्हणत कडक शब्दात जान्हवी किल्लेकरची शाळा घेत वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा दर्शविला आहे.