Reshma Shinde Wedding : सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अनेक दिवसांपासून रेश्माच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. रेश्मा शिंदे पवन यांच्यासह लग्नबंधनात अडकली आहे. इतक्या दिवसांपासून रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत कोणतीच अपडेट दिली नव्हती. त्यानंतर थेट फोटो पोस्ट करत तिने लग्नबंधनात अडकली असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रेश्माने हळदी समारंभाचे फोटो शेअर करत तिच्या नवऱ्याची खास झलक दाखविली. त्यानंतर आज अभिनेत्रीचा थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाला आहे. आयुष्याची नवी सुरुवात असं कॅप्शन देत तिने लग्नसमारंभातील खास फोटो पोस्ट केले आहेत. लग्नातील समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. यावेळी दोघांनी एकमेकांना साजेसे असे कपडे परिधान केले होते. रेश्मा व पवन यांच्या लग्नाच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. मराठमोळ्या व दाक्षिणात्य पद्धतीने तिने लग्न केलं असल्याचं तिच्या लूकवरुन समोर आलं आहे.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकली विवाहबंधनात, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये रेश्मा नवरी मुलीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. तर रेश्माच्या नवऱ्याने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी आणि रेश्माच्या साडीला मॅचिंग असा त्यावर गुलाबी रंगाचा शेला घेतल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा हा मराठमोळा लूक खूप खास आहे. याशिवाय अभिनेत्रीचा लग्नातील आणखी एक लूक समोर आला आहे. या लूकमध्ये अभिनेत्रीचा साऊथ इंडियन लूक पाहायला मिळत आहे. या लूकमध्ये रेश्माने गोल्डन रंगाची साडी आणि त्यावर गडद लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे, तर पवनने गोल्डन रंगाचा साऊथ इंडियन लूक परिधान केला आहे. भर मंडपात नवऱ्याला मिठी मारतानाचा अभिनेत्रीचा हा साऊथ इंडियन लूक लक्ष वेधून घेत आहे.
लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत रेश्माने याला “आयुष्याची नवीन सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनपुढे अभिनेत्रीने इन्फिनिटी, लव्ह आणि नजरेचा इमोजी शेअर केला आहे. संपूर्ण कलाविश्वातून रेश्मावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमुळे रेश्माची लोकप्रियता वाढली. सध्या अभिनेत्री घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.