गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भव्य चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याची चर्चा सुरु आहे आणि हा चित्रपट म्हणजे ‘छावा’. २० जानेवारी रोजी शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमधुन विकीचे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विविध लूक पाहायला मिळाले. या फोटोंमधून महाराजांची शौर्यगाथा मांडण्यात आली. ‘अग्नि भी वो, पानी भी वो, तूफान भी वो, शेर शिवा का छावा है वो’, असे कॅप्शन देत हे खास फोटो शेअर करण्यात आले होते. अशातच आता ‘छावा’मधील अभिनेत्री रश्मिका मंदानचे फोटो समोर आले आहेत. (Rashmika Mandana Chhaava movie look)
‘छावा’मध्ये रश्मिका महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील रश्मिकाचे दोन फोटो समोर आले आहेत. यापैकी एका फोटोत तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे, तर दुसऱ्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये भरजरी पैठणी साडी, मराठमोळे दागिने आणि कपाळावर लाल कुंकू… अश्या मराठमोळ्या लूक्समध्ये रश्मिका दिसत आहे आणि तिचा हे फोटो अनेकांच्या पसंतीसही उतरले आहेत.
“प्रत्येक महान राजामागे, अतुलनीय शक्ती असलेली एक राणी उभी असते. स्वराज्याचा अभिमान महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना दिसणार” असं म्हणत ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आहे. रश्मिकाच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तिच्या या भूमिकेसाठी कौतुक केलं आहे. तर काहींनी तिची या भूमिकेसाठीची निवड चुकली असल्याचे म्हटलं आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी-कुंकू, काळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, फोटो समोर
दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागे निर्मात्यांनी खास शक्कल लढवली आहे. ती म्हणजे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काहीच दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधून निर्मात्यांनी ‘छावा’ हा बहुचर्चित व बहूप्रतिक्षित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.