मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री प्रिया बेर्डे गेली अनेक वर्ष चित्रपट, मालिका, नाटकांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही प्रिया बेर्डे झळकल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अभिनयाबरोबर प्रिया बेर्डे राजकारणात सक्रिय असून त्या कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. (priya berde)
छोट्या पडद्यावर ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री प्रिया बेर्डे मालिकेच्या टीमसह एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी बोलताना प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या निधनानंतर घडलेला प्रसंग सांगितला. शिवाय त्यांच्या मुलांनी केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे आपल्याला कशी प्रेरणा मिळाली, याचा किस्सा सांगितला.
काय म्हणाल्या प्रिया बेर्डे ? (priya berde talk about her situation after laxmikant berde death)
अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या, “लक्ष्मीकांत बेर्डे गेले. त्याच्यानंतर आर्थिक, मानसिक ह्या सगळ्या बाजूने मी पूर्णपणे खचले होते. आपल्या आयुष्यात पुढे काहीच नाही राहिलं. ‘आता ही २ मुलं मोठी कशी करायची ? कसं सांभाळायचं ह्यांना ?’ असे विचार माझ्या मनात सुरु होते. हे सगळं सुरु असताना स्वानंदी मला म्हणाली की, “मम्मी, पप्पा कुठे गेले ?”, त्यावर अभिनय म्हणाला “थांब तुला दाखवतो इकडे ये”. नंतर अभिनय स्वानंदीला खिडकीमध्ये घेऊन गेला आणि आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला “ते बघ ते तारे आलेत ना, ते आपले पप्पा आहेत”. हे पाहून तेव्हा मला असा वाटलं की, अरे या एवढ्याश्या मुलाला एवढी अक्कल आहे, तो आपल्या बहिणीला सांगतोय. पुढे स्वानंदी त्याला विचारायची की, ‘पप्पा कधी परत येणार ?’ आणि अभिनय सांगायचा की ‘तू दहावीला गेलीस ना, की पप्पा परत येणार’. पुढे ती जेव्हा दहावीत आली, तोपर्यंत तिला कळलं होता की आता पप्पा काही परत येणार नाहीत. पण तो दिवस, ती रात्र माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरली होती.”
हे देखील वाचा – “…अन् मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र्य झाली”, ‘बाईपण भारी देवा’ने गाठला इतके कोटी रुपयांचा टप्पा, केदार शिंदे म्हणतात, “एक स्त्री…”
“आणि तेव्हा मी त्या दोन मुलांकडे बघून म्हटलं की नाही प्रिया, आता तुला उभा राहायचंय. खूप झालं आता, खूप रडलीस, खूप झालं, सगळं झालं. सगळ्यांसाठी सगळं करून झालं. मनामध्ये कुठलीही खंत नाही, की एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली. मी सगळं केलं सगळ्यांच्यासाठी, सेवा केली, सगळं केलं. पण आता तुला तुझ्या मुलांसाठी उभं राहायचं आणि स्वतःसाठी उभं राहायचंय.” असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.
हे देखील वाचा – Deepa Parab On Tu Chal Pudh: ‘तू चाल पुढं’ मालिकेला एक वर्ष पूर्ण होताच दीपा परब भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवून…”
अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘सिंधुताई माझी माई’ या नव्या मालिकेतून तब्बल ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. ज्यात त्या सिंधुताईं सपकाळ यांच्या आजीची म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत प्रियासह अभिनेते किरण माने व बालकलाकार अनन्या टेकवडे हे मुख्य भूमिकेत आहेत. (priya berde inspired this action by her children after laxmikant berde death)