मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते दिवाने आहेत. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच नुकताच प्राजक्ताचा ३५ वा वाढदिवस झाला. ८ ऑगस्ट २०२४ रोजी प्राजक्ताने अगदी दणक्यात तिचा वाढदिवस साजरा केला. अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्राजक्ताने तिचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीचा यंदाचा वाढदिवस खूप खास आहे. कारण अभिनेत्रीने तिच्या नव्या ‘फुलवंती’ या मराठी प्रोजेक्टची तारीख जाहीर केली आणि हा सिनेमा तिच्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे आहे. (Prajakta Mali Birthday)
‘फुलवंती’च्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. अशातच अभिनेत्रीने फुलवंती चित्रपटाचे पोस्ट शेअर करत तिच्या वाढदिवस साजरा करण्याचेही काही फोटो पोस्ट केले आहेत. ही पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “प्रत्येक कलाकाराचे स्वप्न. “फुलवंती”- माझ्या वाढदिवशी मला मिळालेली ही सर्वात खास भेट व आशीर्वाद आहे. #वातावरण #फुलवंतीमय. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. माझ्या वाढदिवशी प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल माझे सर्व चाहते, डिजिटल प्लॅटफॉर्म, प्रिंट मीडिया, कलाकार आणि मित्रांचे पुरेसे आभार मानूच शकत नाही”.
पुढे ती म्हणाली, “मी नेहमी म्हणते की, या इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नाही; पण माझ्याकडे तुम्ही सर्व आहात- माझे प्रिय प्रेक्षक. जे मला मार्गदर्शन करतात आणि आधार देतात. एक मजबूत आधारस्तंभ म्हणून माझ्याबरोबर राहा, मला आता तुमची सर्वात जास्त गरज आहे. मी निर्माता म्हणून नवीन इनिंग सुरु करत आहे. नेहमीसारखेच माझ्यासह राहा. तुमच्या ‘फुलवंती’कडून प्रेम”, असं म्हणत तिने आभार व्यक्त केले आहेत.
प्राजक्ताचे शिवोsहम् क्रिएशन आणि मंगेश पवार अँड कंपनी यांनी ‘फुलवंती’ची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल तरडे करत असून संवाद लेखनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांच्यावर आहे. मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी हे सिनेमाचे निर्माते आहेत.