अभिनेत्री पायल रोहतगीबद्दलची एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अभिनेत्रीच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे आणि याबद्दल तिने अलीकडेच सोशल मीडियाद्वारे माहीती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आपल्या वडिलांच्या आजारपणाबद्दल सांगितले आहे. अभिनेत्रीचे वडील प्रोस्टेट कर्करोगाशी झुंज देत आहेत. याबद्दल माहिती देत तिने तिच्या चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांची स्थिती आणि कुटुंबाच्या आर्थिक संकटाबद्दलही सांगितले. या पोस्टमध्ये पायल रोहतगीने तिच्या चाहत्यांकडून पाठिंब्याशी व सहकार्याची मागणी केली आहे आणि मदत करण्याचे आवाहनदेखील केलं आहे. (Payal Rohatgi father Prostate Cancer)
पायलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यात असं म्हटले आहे की, “खूप विचार केल्यानंतर मी सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. आपल्या देशात उपचार महाग आहेत आणि प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाकडे मर्यादित पैसा आहे. तसेच माझ्या वडिलांना असे वाटले होते की, त्यांना वैद्यकीय विमा कंपनीकडून लाभ मिळेल ज्याचा प्रीमियम त्यांनी भरला होता. पण त्यांना तो मिळाला नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय विम्याचे प्रीमियम दरवर्षी खूप जास्त असतात. असे असूनही वेळेवर त्यांना लाभ मिळत नाही, तेव्हा खूप वाईट वाटतं. त्यांनी मला माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करण्याची विनंती केली आणि मी ते करत आहे. कारण मला आपल्या देशात उद्योग म्हणून वैद्यकीय विमा कोणत्या आधारावर काम करतो हे निकष लक्षात घ्यायचे आहेत”.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणला भेटताच ‘ती’ मुलगी ढसाढसा रडू लागली अन्…; अजूनही झापुक झुपूकचं क्रेझ, व्हिडीओ व्हायरल
यापुढे पायलने असं लिहिले आहे की, “माझे वडील एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि २०१८ पासून ते प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत. २००६ पासून COPD म्हणजेच त्यांचे फुफ्फुस आकुंचन पावत आहे आणि २००८ पासून त्यांना खूप गंभीर ऑस्टिओपोरोसिस आहे. माझ्या वडिलांसाठी क्राउड फंडिंग म्हणजेच देणगी आवश्यक आहे. माझ्या वडिलांनी मला या माध्यमाचा वापर करुन पैसे जमा करण्याची मागणी केली आणि म्हणून मी हे करत आहे. त्यामुळे माझी सर्व चाहत्यांना आणि फॉलोअर्सना विनंती आहे की, त्यांनी उदार मनाने देणगी देत मदत करावी आणि खालील खात्यात पैसे जमा करावे. या मदतीची संपूर्ण वैद्यकीय फाइल ईमेलवर पाठविली जाऊ शकते”.
दरम्यान, पायलबद्दल सांगायचे झाले तर पायल रोहतगी २००८ मध्ये ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक होती. २०२२ मध्ये, तिने ALT बालाजीच्या रिॲलिटी टेलिव्हिजन शो ‘लॉक अप’मध्ये भाग घेतला आणि ती उपविजेती ठरली होती. या शोदरम्यान पायलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. रोहतगीने ’36 चायना टाउन’, ‘अग्ली और पगली’ आणि इरफान खानच्या ‘दिल कबड्डी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.