छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहाची हटके स्टाइल कायमच प्रेक्षकांना भावतो असं असलं तरी बरेचदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचा सामना हा करावा लागतो. मराठी चित्रपटसृष्टीसह नेहाने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अशा या अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरी झाली असल्याचं समोर आलं आहे. (Marathi Actress Neha Pendse)
अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अभिनेत्रीच्या पतीच्या ड्रायव्हरने एफआयआर दाखल केला आहे. नेहा पेंडसेचा पती शार्दुल सिंग बायस याच्याकडे कामाला असलेला चालक रत्नेश झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील अरेटो बिल्डिंगच्या २३व्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही चोरी झाली असल्याचं समोर आलं आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त जाहीर केलं आहे. या तक्रारीत झा यांनी नमूद केले आहे की, २८ डिसेंबर रोजी बायस यांनी त्यांना चार वर्षांपूर्वी लग्नात भेट म्हणून मिळालेले सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याने जडवलेली अंगठी हरवल्याचे सांगितले. बायस हे दागिने सहसा बाहेर घालायचे आणि घरी परतल्यावर त्यांनी ते दागिने घरातील नोकर सुमित कुमार सोलंकी याच्याकडे सोपवले, त्यानंतर त्याने ते दागिने बेडरूमच्या कपाटात ठेवले.
घरातील मदतनीस हे त्यांच्या घरातच राहतात. घटनेच्या दिवशी बायस बाहेर जाण्याच्या तयारीत असताना ते कपाटात दागिने शोधत होते. परंतु, त्यांना दागिने सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व लोकांकडे चौकशी केली. परंतु, कोणालाच दागिन्यांविषयी माहिती नव्हती. घरातील सर्व नोकरांकडे चौकशी करूनही हरवलेल्या वस्तूंची कोणालाच माहिती नव्हती. त्यावेळी सोलंकी घरी नव्हते, संपर्क साधला असता तो कुलाबा येथे मावशीच्या घरी असल्याचा दावा त्यांनी केला.
सोलंकी यांची अधिक विचारपूस केल्यावर त्यांनी दागिने नेमून दिलेल्या जागीच ठेवल्याच सांगितलं. मात्र, बायसने शोधाशोध केली असता दागिने कुठेच सापडले नाहीत. सोलंकीबद्दल संशय वाढल्याने, बायसने त्याला त्वरित घरी परतण्याची विनंती केली. मात्र सोलंकी त्वरित घरी न परतता उशिराने घरी आला. बायसचा ड्रायव्हर झा याने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करुन सोलंकी हा संभाव्य संशयित असल्याचं सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सोलंकीला अटक केली असली तरी चोरीचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत.