अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. अगदी शाही थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. गौतमी व स्वानंदच्या लग्नातील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसले. याशिवाय दोघांच्या लग्नाआधीच्या विधींनी म्हणजेच हळदी, संगीत सोहळ्यातील फोटो, व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल झाले. गौतमीच्या लग्नाला तिची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. (Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding)
लग्नाआधी दोन दिवस बहिणीच्या संगीत सोहळ्याची तयारी करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया वरून शेअर केला होता. याशिवाय बहिणीच्या केळवणाची ही मृण्मयीने जोरदार तयारी केलेली पाहायला मिळाली. गौतमीच्या लग्नातील मृण्मयीचा हटके लूकही प्रेक्षकांना विशेष भावला. मराठमोळ्या लूकमध्ये मृण्मयीचं सर्वांनीच कौतुक केलं. बहिणीच्या लग्नात स्वानंदसह गौतमीचाही मृण्मयीने कान पिळलेला पाहायला मिळाला. यानंतर आता मृण्मयीने बहिणीच्या लग्नानंतर सोशल मीडियावरून एक भावुक पोस्ट केली आहे.
मृण्मयी व गौतमीचं बॉण्ड सर्वांनाच माहीत आहे. या देशपांडे सिस्टर्सचं एकमेकींशिवाय पानही हलत नाही हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन कळते. मृण्मयीने तिच्या लाडक्या बहिणीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यांत अभिनेत्रीने म्हटलं आहे की, “अजूनही विश्वास बसत नाही आहे की गौतमीचं लग्न झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली. या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाही आहे. आनंद, काळजी आणि आता ती पूर्णतः दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद, सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत. काल परवापर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे. यापुढे आम्हा बहिणींच्या गप्पा एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो” ही तिची तक्रार संपेल कारण ? तिचं तिलाच कळेल”.
यापुढे अभिनेत्रीने लिहिलं आहे की, “स्वानंद. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाही आहे. लग्नाआधीच तू आमच्या कुटुंबाचा भाग झाला होतास. गौतमी स्वानंदची काळजी घे. स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस. संसार कोणाचाच सोपा नसतो पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवर मात करता येते. कदाचित सहज नाही पण मात करता येते. एकमेकांवर विश्वास असू द्या, संवाद असू द्या, नातं वा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते. एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा. एकमेकांना सांभाळून घ्या. आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत. सगळ्यांची काळजी घ्या आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. लै हनीन” असा मोलाचा सल्ला मृण्मयीने नववधूवराला दिला आहे.
.